जगभरातील खेळांचे महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांना प्रारंभ होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. यावेळच्या ऑलिम्पिक स्पर्धा जपानची राजधानी टोकियो येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारताचे ११९ जणांचे पथक रवाना झाले असतानाच, भारताच्या आणखी एका खेळाडूला या ऑलिम्पिकसाठी अचानकपणे पात्रता मिळाली आहे. या ऑलिम्पिकमधून अनेक टेनिसपटूंनी माघार घेतल्यामुळे भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागल या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल.
खेळाडूंच्या माघारीने मार्ग झाला सोपा
सध्या जगभरात कोरोना या आजाराचे सावट आहे. याच सावटाखाली एक वर्ष पुढे ढकलली गेलेली टोकियो ऑलिम्पिक विनाप्रेक्षक खेळवली जाईल. पण या स्पर्धेतून विविध कारणांनी अव्वल टेनिसपटू राफेल नदाल, रॉजर फेडरर, डॅन इवान्स, वासेक पॉस्पिसील व ऍलेक्स डी मिनार, सेरेना विलियम्सन, स्टॅन वावरिंका, डॉमनिक थीम यांनी माघार घेतली आहे. त्यानंंतर, आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने अनेक युवा खेळाडूंना क्रमवारीनुसार संधी दिली.
सुमितला लागली लॉटरी
खेळाडूंच्या माघारीनंतर भारताचा प्रमुख टेनिसपटू सुमित नागल याला टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले. तो सध्या जागतिक क्रमवारीत १४४ व्या क्रमांकावर आहे. क्रमवारीनुसार, हे स्थान भारताचा १२७ व्या क्रमांकावर असलेल्या युकी भांबरी याला मिळाले होते. मात्र, तो उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने सुमितला संधी मिळाली. सुमितच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा भारतीय टेनिस संघटनेने केली. भारताच्याच प्रज्ञेश गुणेश्वरन याची संधी थोडक्यात हुकली. तो क्रमवारीत १४८ व्या स्थानी आहे.
भारताचे केवळ तीन टेनिसपटू होणार सहभागी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे एकूण १२० जणांचे पथक सहभागी होणार आहे. यापैकी टेनिसमध्ये केवळ महिला दुहेरीत भारत प्रतिनिधित्व करणार होता. अनुभवी सानिया मिर्झा व युवा अंकिता रैना या ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील. तसेच, आता सुमित नागल पुरुष एकेरीत भारताचे आव्हान उभे करेल. ऑलिम्पिक टेनिसमध्ये भारताला आतापर्यंत केवळ एक पदक मिळाले असून, १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये लिएंडर पेसने पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीपेक्षा ‘या’ दिग्गजाला अधिक पाहावी लागली होती शतकाची वाट
भारताविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, ‘या’ २४ खेळाडूंचा मिळाली संधी