भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये एकमेव कसोटी सामना आणि वनडे मालिका पार पडल्यानंतर आता टी२० मालिकेची लढत चालू आहे. रविवारी (११ जुलै) काउंटी ग्राउंड, होव येथे या मालिकेतील दुसरा टी२० सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला केवळ १४८ धावाच करता आल्या होत्या.
एकाहून एक सरस फलंदाजांची भरमार असलेल्या इंग्लंड संघासाठी हे लक्ष्य सहज पार करण्याजोगे होते. मात्र भारतीय महिलांच्या चपळ क्षेत्ररक्षणाने त्यांच्या तोंडून विजयाचा घास खेचून घेतला आणि ८ धावांनी सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
अप्रतिम झेल पकडण्याबरोबरच भारतीय क्रिकेटपटूंनी इंग्लंडच्या तब्बल ४ फलंदाजांना धावबाद केले. तत्पुर्वी पहिल्या टी२०तही हरलीन देओलने अद्भुत झेल पकडत अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही गुनगाण गायला भाग पाडले होते. याच सामन्यात यष्टीरक्षक रिचा घोष हिनेही अगदी सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांमध्ये गणला जाणारा एमएस धोनीप्रमाणे चपळता दाखवली होती.
परंतु भारतीय क्रिकेटपटूंच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचे खरे श्रेय जाते ते त्यांचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा यांना. भारतीय टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनेही संघातील खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामागे त्यांचाच हात असल्याचे म्हटले होते. पण हे अभय शर्मा नक्की आहेत तरी कोण? चला जाणून घेऊया…
वर सांगितल्याप्रमाणे, अभय शर्मा हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापुर्वी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही काळापासून प्रशिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या अभय यांनी देशांतर्गत पातळीवर राहुल द्रविड यांच्यासोबत काम केले आहे. ते भारत अ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक राहिले आहेत.
प्रशिक्षण क्षेत्रात येण्यापुर्वी अभय हे एक यष्टीरक्षक फलंदाज राहिले आहेत. मात्र दुर्दैवाने त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करता आले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते दिल्ली आणि रेल्वे संघाकडून खेळले आहेत. ९० च्या दशकात जेव्हा भारतीय संघाला एका स्थायी यष्टीरक्षकाचा शोध होता, तेव्हा अभय या स्थानासाठी प्रबळ दावेदार होते. मात्र सबा करीम, एमएसके प्रसाद आणि अजय रात्रा यांची नावे या शर्यतीत आघाडीवर राहिली. त्यामुळे अभय यांचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.
असे असले तरीही, या शिलेदाराने देशांतर्गत क्रिकेटचे मैदान मात्र गाजवले. ८९ प्रथम श्रेणी सामने खेळताना त्यांनी ४१०५ धावांची कामगिरी केली. दरम्यान ९ शतके अन् २० अर्धशतकांचीही नोंद केली. फलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणातही १४५ झेल आणि ३४ यष्टीचीत विकेट्स नोंदवल्या. याखेरीज ४० अ दर्जाच्या सामन्यात ७८० धावा आणि २० झेल व ११ स्टंपिंगची कामगिरी केली.
अखेर क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर २००७ मध्ये त्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात पदार्पण केले होते. तत्पुर्वी त्यांनी फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा कोर्सही केला होता. ७ वर्षे रेल्वे संघाचे प्रशिक्षण केल्यानंतर त्यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत संधी मिळाली. येथे अकादमीचे अध्यक्ष द्रविड यांचा सहवास त्यांना लाभला आणि ते एक प्रतिष्ठित क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनले. आता हा दुर्लभ प्रतिभा असलेला दिग्गज भारतीय महिला क्रिकेटपटूंना आपल्याप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बनवण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चोख प्रत्युत्तर! ब्रेक डान्सच्या बदल्यात ब्रेक डान्स, बांगलादेश-झिम्बाब्वे कसोटीतील लक्षवेधी प्रसंग
गांगुलीच्या निरोप सामन्यात धोनीने केलं असं काही, ‘दादा’ला अनावर झाले अश्रू; वाचा किस्सा
एक संघ सुट्टीत तर दुसरा सरावात व्यस्त; मालिका पुढे ढकलल्यानंतर ‘धवनसेने’चा अजून जोमाने सराव सुरू