साउथँम्पटन। शनिवारी(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला.
या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकात एक खास विक्रम केला आहे. भारताचा हा वनडे विश्वचषतकातील 50 वा विजय होता. त्यामुळे विश्वचषक इतिहासात 50 किंवा त्यापेक्षा अधिक विजय मिळवणारा भारत केवळ तिसराच संघ ठरला आहे.
याआधी विश्वचषकात 50 विजयांचा टप्पा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाने पार केला आहे. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत विश्वचषकात सर्वाधिक 67 विजय मिळवले आहेत. तर न्यूझीलंड विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत 53 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचा थोडक्यात आढावा –
शनिवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 224 धावा करत अफगाणिस्तान समोर विजयासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 67 धावांची तर केदार जाधवने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.
तसेच गोलंदाजीत अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नाईबने आणि मोहम्मद नाबीने प्रत्येकी 2 विकेट घेतली; तसेच राशिद खान, रेहमत शहा, मुजीब उर रेहमान आणि अफताब आलमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव 49.5 षटकात सर्वबाद 213 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताने 11 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने 52 धावांची अर्धशतकी खेळी करत शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली होती.
पण अखेर त्याला शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने बाद केले. त्याला बाद केल्यानंतर लगेचच पुढील दोन चेंडूत शमीने आणखी दोन विकेट्स घेतल्या आणि हॅट्रिकही साजरी केली.
भारताकडून गोलंदाजीत शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर बुमराहने रेहमत शहा(36) आणि हशमततुल्लाह शाहीदी(21) यांच्या महत्त्वाच्या 2 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. त्याचबरोबर या दोघां व्यतिरिक्त युजवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्यानेही प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवणारे संघ –
67 – ऑस्ट्रेलिया
53 – न्यूझीलंड
50 – भारत
45 – इंग्लंड
42 – विंडीज
41 – पाकिस्तान
37 – श्रीलंका
36 – दक्षिण आफ्रिका
13 – बांगलादेश
11 – झिम्बाब्वे
7 – आयर्लंड
6 – केनिया
2 – कॅनडा, नेदरलँड्स
1 – अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–संपूर्ण यादी – आत्तापर्यंत या गोलंदाजांनी घेतले आहेत विश्वचषकात हॅट्रिक
–मोहम्मद शमीने घेतली विश्वचषक २०१९ मधील पहिली हॅट्रिक, पहा व्हिडिओ
–२७ वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने विश्वचषकात केली अशी कामगिरी