आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराची घोषणा मंगळवारी (16 जानेवारी) केली गेली. डिसेंबर 2023 मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूला हा पुरस्कार दिला गेला. भारतीय महिला संघाची अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अप्रतिम खेळी केली. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये दीप्तीने आपली छाप पाडली होती. याच प्रदर्शनाच्या जोरावर महिलांसाठी दिला जाणारा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार तिला मिळाला.
डिसेंबर महिन्यात खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने भारतासाठी 165 धावांचे योगदान दिले. यादरम्यान तिची सरासरी धावसंख्या 55 होती. गोलंदाजी विभागात देखील दीप्तीचे नेत्रदीपक प्रदर्शन केले. तिने महिनाभरात 11 विकेट्स घेतल्या. यादरम्यान तिची सरासरी 10.81 इतकी होती.
इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात दीप्तीने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 67 धावा केल्या. या सामन्यातील तिची गोलंदाजी निर्णायक ठरली. अवघ्या 7 धावा खर्च करून तिने 5 विकेट्स नावावर केल्या. याच सामन्यातील दुसऱ्या डावात तिने 32 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या होत्या. एकूण 9 विकेट्स घेत अष्टपैलू खेळाडूने इंग्लंड संघाचा अक्षरशः घाम काढला होता. या सामन्यात इंग्लंडची धावसंख्या पहिल्या डावात 3 बाद 108 धावा होती. पण दीप्तीने विकेट्सचे पंचक घेत इंग्लंडला 136 धावांवर सर्वबाद केले.
Game-changing spells in both innings ✅
Runs with the bat ✅A Test match to remember for Deepti Sharma 👏#INDvENG pic.twitter.com/25JsKJF56G
— ICC (@ICC) December 16, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात देखील दीप्तीने आपली लय सोडली नाही. तिने या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली हिची विकेट घेतली. तसेच फंलदाजी करताना 78 धावांचे योगदान दिले. भारताला सामन्यात आघाडी मिळवून देण्यासाठी या धावा महत्वाच्या होत्या. भारताने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही दीप्ती जबरदस्त फॉर्ममध्ये दिसली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तीने 38 धावा खर्च करून पाच विकेट्स नावावर केल्या. असे असले तरी, दीप्ती भारताला विजय मिळवून देऊ शकली नव्हती. ऑस्ट्रेलियाने अवघ्या 3 धावांनी हा सामना नावावर केला होता. याच महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली होती. या मालिकेत दीप्तीने चांगली गोलंदाजी केली असून 5.88च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या.
माध्यमांतील वृत्तानुसार दीप्ती शर्मा केवळ दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे, जिला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला. याआधी ऑक्टोबर 2022 मधील आपल्या प्रदर्शनासाठी हरमनप्रीत कौर हिला हा सन्मान मिळाला होता.
दुसरीकडे पुरुषांच्या विभागात डिसेंबरमधील प्रदर्शनासाठी पॅट कमिन्स (Pat Cummins) प्लेअर ऑफ द मंथ ठरला. कमिन्सने डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने तीन सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या. यात तीन वेळा त्याने विकेट्सचे पंचक (फाईव्ह विकेट हॉल) देखील घेतले. पाकिस्तानला या मालिकेतील एकही सामना जिंकता किंवा अनिर्णित करता आला नाही.
महत्वाच्या बातम्या –
Team India । ‘या’ खेळाडूत आहे भारतासाठी पुढचा युवराज बनण्याची गुणवत्ता, स्वतः युवीनेच सांगितले नाव
अर्रर्र!!! कूणालाही नको असलेला रेकॉर्ड होणार रोहितच्या नावावर, T-20 Internationals मध्ये ओढवू शकते नामुष्की