भारतीय क्रिकेट संघाने कसोटी इतिहासातील पहिला सामना १९३२ साली खेळला. तेव्हापासून भारताला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. १९३२ सालानंतर भारताने अनेक सामने खेळले पण तब्बल पहिल्या २० वर्षांत भारताला विजय मिळाला नाही. २० वर्षे भारताला पहिल्या कसोटी विजयाची प्रतिक्षा करावी लागली. ही प्रतिक्षा संपुष्टात आली ती १९५२ साली मद्रास अर्थात आत्ताच्या चेन्नई या शहरात.
भारताने ७२ वर्षांपूर्वी ६ ते १० फेब्रुवारी १९५२ दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम या स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या कसोटी सामन्यात विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला होता. हा भारताचा कसोटी इतिहासातील पहिला विजय ठरला होता. विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली एक डाव आणि ८ धावांच्या फरकाने इंग्लंडला हरवून हा इतिहास रचला गेला.
त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार डोनाल्ड कॅर हे होते, त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडने १२१.५ षटकात सर्वबाद गमावून २६६ इतकी धावसंख्या उभारली होती. इंग्लंडच्या जॅक रोबर्टसनने ७७, डिक स्पूनरने ६६, तर कर्णधार डोनाल्ड कॅर आणि टॉम ग्रेव्हने अनुक्रमे ४० आणि ३९ इतक्या धावा केल्या होत्या. त्यातच भारतीय संघाच्या विनू मंकड यांनी ८ गडी बाद केले होते.
पहिला डाव भारतीय संघाने १५३ षटकात ९ बाद ४५७ धावा काढून घोषित केला. भारतासाठी खेळणाऱ्या पॉली उम्रीगर यांनी या डावात नाबाद १३० धावा काढल्या होत्या तर पंकज रॉय यांनी १११ धावा काढल्या. त्यानंतर भारताच्या दत्तू फडकर यांनी ६१ धावा काढल्या. त्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्ध १९१ धावांची आघाडी घेतली. त्याचवेळी इंग्लंडचा दुसरा डाव हा १८३ इतक्याच डावात गडगडला आणि भारताने एक डाव आणि ८ धावांनी विजय संपादित केला. दुसऱ्या डावातही मंकड यांनी ४ विकेट्स घेतल्या. तसेच घुलाम अहमद यांनीही ४ विकेट्स घेतल्या. तर दत्तू फडकर आणि रमेश दिवेचा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हा विजय भारताने कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा मिळवला असल्याने तो ऐतिहासिक ठरला. त्यानंतर गेल्या काही वर्षांत भारताने मोठी प्रगती केली आहे. आज भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट विश्वात एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. पण या संघाच्या यशाचा पाया रचला गेला तो ७० वर्षांपूर्वी झालेल्या मद्रास कसोटीत, ज्यात भारताने विजय मिळवण्याची किमया करुन दाखवली.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! अर्जुन पुरस्कार विजेत्या हॉकीपटूवर बलात्काराचे आरोप! दोन दिवसांपूर्वीच झालेली डीएसपी पदी नियुक्ती
दक्षिण आशियातील पहिली-वहिली महिला हँडबॉल लीग भारतात होणार, आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्टार खेळणार