भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या मालिकेत भारताने ३-० अशा फरकाने न्यूझीलंडचा पराभव केला. भारतीय संघातील जवळपास प्रत्येक खेळाडूने या मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. असे असले तरी, माजी भारतीय दिग्गज आकाश चोप्रा यांनी संघातील कमतरता दाखवून दिली आहे. त्यांच्या मते भारतीय संघाच्या खालच्या फळीचे प्रदर्शन चिंतेचा विषय आहे. त्यांनी याविषयी बोलताना खास करून रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यावर निशाणा साधला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेदरम्यान भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांना जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. पण जेव्हा त्यांची खेळण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी निराश केलेले पाहायला मिळाले. आता याच पार्श्वभूमीवर आकाश चोप्रा यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना ते म्हणाले की, “खालची फळी ही चिंतेचा विषय आहे, कारण रिषभ पंतने त्या प्रकारची फलंदाजी केली नाही, जशी आपण त्याच्याकडून अपेक्षा करतो. त्याने त्याप्रकारची फलंदीजी केली नाही, जशी तो करू शकतो. त्याच्याकडून यापेक्षा चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती.”
आकाश चोप्रांच्या मते पंत कसोटी क्रिकेटप्रमाणे टी२० क्रिकेटमध्ये अद्याप प्रदर्शन करू शकलेला नाही. ते पुढे बोलताना म्हणाले की, “त्याच्या बॅटमधून धावा येतात, तो षटकारही मारतो, मला वाटते की, त्याने अजून टी२० मध्ये यशस्वी होण्याची कसोटी पार केली नाहीय, जे थोडे निराशाजनक आहे. तो कसोटीमध्ये एकदम अप्रतिम आहे, हा तो प्रकार आहे, ज्याला त्याने सहज पार केले. मात्र, तो अजून इतर प्रकारांमध्ये यशस्वी होण्याचा रस्ता शोधत आहे.”
तिसऱ्या टी२० सामन्यात श्रेयस अय्यरकडे चांगली खेळी करण्याची संधी होती. पण, त्याने मोठा फटका खेळण्याच्या नादात विकेट गमावला होता. याबाबत बोलताना आकाश चोप्रा म्हणाले की, “श्रेयस अय्यरला त्याच्या नियमित फलंदाजी क्रमावरून हटवून ५ व्या क्रमांकावर खेळवण्यामागे काही खास अपेक्षा होत्या. शेवटच्या सामन्यात त्याच्याकडे संधी होती. पण खराब फटका खेळून तो बाद झाला.”






