ऑस्ट्रेलिया दौर्यावरील दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळविला. यासह ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी देखील साधली. ऍडलेड कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ टीकेचा धनी झाला होता. अवघ्या ३६ धावांवर डाव संपुष्टात आल्याची जखम भारतीय क्रिकेट जगतात कित्येक काळ भळभळत राहील, अशीच शक्यता होती. मात्र अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जिगरबाज वृत्ती दाखवून पुनरागमन करत या जखमेवर फुंकर मारली आहे.
हा विजय भारतीय संघासाठी अनेक दृष्टीने महत्वाचा आहे. आपल्या कसोटी इतिहासातील सगळ्यात नीचांकी धावसंख्या नोंदविल्यानंतर साहजिकच कुठल्याही संघाचा आत्मविश्वास डळमळीत होतो. तंत्रापासून ते दर्जापर्यंत, सगळ्यांच गोष्टींवर शंका घेतली जाते. जाणकार मंडळींकडूनही टीकेचे वार झेलावे लागतात. मात्र, भारतीय संघाने ही परिस्थिती संयमाने हाताळली. पहिल्या कसोटीत केवळ ४० मिनिटे खराब खेळल्याने नुकसान झाले होते, मात्र त्यावर अधिक चर्चा करण्याऐवजी इतर सकारात्मक बाबींवर संघाने लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच दुसर्या कसोटीतील हे ऐतिहासिक पुनरागमन साध्य होऊ शकले.
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत हा विजय मिळविला असल्याने, त्याचे महत्त्व काकणभर अधिकच आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा असे आघाडीचे खेळाडू नसतानाही ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने भारताने आपली दुसरी फळी देखील मजबूत असल्याचे सिद्ध केले.
या विजयाचे गोडवे अनेक पिढ्या गायले जातील. मात्र त्यानिमित्ताने या विजयामागील प्रमुख कारणे जाणून घेणे देखील उचित ठरेल.
१) अजिंक्य रहाणेचे नेतृत्वकौशल्य-
अजिंक्य रहाणे भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थाने नायक ठरला. विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतल्याने रहाणेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली होती. मात्र पहिल्या कसोटीतील पराभवामुळे या माळेतील फुलांऐवजी काटेच रहाणेला अधिक टोचले असतील. पण आपल्या धीरोदात्त स्वभावाने रहाणेने या चक्रव्यूहाचा सामना केला आणि नावाप्रमाणेच ‘अजिंक्य’ राहून परतला.
त्याचे या सामन्यातील नेतृत्व कौशल्य निर्विवादपणे वाखाणण्याजोगे होते. गोलंदाजांना योग्य ते स्वातंत्र्य देत त्यांचा केलेला अचूक वापर, क्षेत्ररचनेत दाखवलेली कल्पकता आणि मैदानावर सतत सक्रिय असणे, या गोष्टींनी रहाणेच्या पारड्यात यशाचे दान टाकले.
याशिवाय फलंदाज म्हणून त्याने दिलेलं योगदान या सामन्यात निर्णायक ठरलं. ११२ धावांची त्याची शतकी खेळी निश्चितच निर्दोष नव्हती, २-३ वेळा त्याला या खेळीत जीवदाने देखील मिळाली. परंतु, त्याची लढाऊ वृत्ती भारतासाठी तारक ठरली. या मालिकेतील २ सामन्यांत दोन्ही संघांमधील खेळाडूने झळकाविलेले हे एकमेव शतक आहे, यावरुन या शतकाचे महत्व लक्षात येईल. कर्णधार म्हणून त्याने आघाडीवर राहत संघासमोर ठेवलेल्या उदाहरणामुळे भारताला हा विजय साध्य झाला.
२) गोलंदाजीतील सातत्य
कसोटी सामन्यांत विजय प्राप्त करायचा असल्यास प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेऊ शकणारे गोलंदाजी आक्रमण असणे, आवश्यक असते. भारतीय गोलंदाजी आक्रमणाने हे सातत्याने केल्याने गेल्या काही वर्षात भारताला कसोटी क्रिकेटमध्ये लक्षणीय यश मिळाले आहे. जसप्रीत बुमराहने आपण केवळ मर्यादित षटकांचे गोलंदाज नसल्याचे, वारंवार सिद्ध केलेच आहे. मात्र या सामन्यात मोहम्मद शमी आणि इशांत शर्माच्या अनुपस्थितीत त्याने गोलंदाजी आक्रमणाचे समर्थपणे नेतृत्वही केले. फिरकीपटू आर अश्विनने परदेशी खेळपट्ट्यांवर अपयशी ठरतो, या टीकेला सडेतोड उत्तर देत अनुभवी गोलंदाजाची भूमिका चोख निभावली. विशेषतः ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव स्मिथला त्याने ज्या पद्धतीने आपले गिर्हाईक केले, ते पाहून भारतीय क्रिकेट चाहते सुखावले असतील. या दोघांना उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि पदार्पणवीर मोहम्मद सिराज यांनीही तोलामोलाची साथ दिली.
३) धाडसी संघनिवड-
दुसर्या कसोटी सामन्यासाठी भारताने अंतिम अकराच्या संघात चार बदल केले. पृथ्वी शॉच्या जागी शुबमन गिल, मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराज आणि वृद्धिमान साहाच्या स्थानी रिषभ पंत हे अपेक्षित बदल करण्यात आले. मात्र विराट कोहलीच्या स्थानावर रवींद्र जडेजाला संधी मिळाल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. खासकरुन पहिल्या सामन्यात फलंदाजी कोसळल्याने कोहलीच्या स्थानावर विशेषज्ञ फलंदाज निवडला जाईल, अशी अपेक्षा असताना संघ व्यवस्थापनाने जडेजाच्या रुपात अष्टपैलूला संधी देण्याचा जुगार खेळला. मात्र सामना संपल्यावर हा जुगार कमालीचा यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले. जडेजाने सामन्यात ३ बळी पटकाविले तसेच पहिल्या डावात मॅथ्यू वेडचा एक कठीण झेलही घेतला. मात्र त्याने पहिल्या डावात काढलेल्या ५७ धावा, या भारतासाठी बहुमोल ठरल्या. या सामन्यात रहाणे शिवाय अर्धशतकाची वेस ओलांडणारा एकमेव फलंदाज ठरला. त्यामुळे ही धाडसी संघनिवड भारतासाठी अंतिमतः फलदायी ठरली.
४) पदार्पणवीरांची कमाल-
भारताकडून या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या दोन खेळाडूंनी आपले कसोटी पदार्पण केले. मात्र पदार्पणातच त्यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शुबमन गिलने पहिल्या डावात ४५ तर दुसर्या डावात नाबाद ३५ धावा काढल्या. पहिल्या डावात त्याने दिलेल्या सकारात्मक सुरुवातीमुळे भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला. त्याचप्रमाणे मोहम्मद सिराजनेही पदार्पणातच प्रभावित केले. त्याने पहिल्या डावात ४० धावांत २ बळी घेतले, तर दुसर्या डावात ३७ धावांत ३ बळी घेत त्या डावातील भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाजही ठरला.
५) सुधारलेले क्षेत्ररक्षण-
पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण अतिशय सुमार दर्जाचे होते. भारतीय खेळाडूंनी किमान चार ते पाच सोपे झेल सोडले. गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला १९५ धावांवर गुंडाळले असले तरी या सुटलेल्या झेलांमुळे २०-३० धावांचा फटका भारताला बसला. मात्र दुसर्या सामन्यात यात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी एकही झेल सोडला नाही. त्याचप्रमाणे धावा रोखण्यातही क्षेत्ररक्षकांनी योगदान दिल्याचे पाहायला मिळाले.
सामन्याचे प्रमुख नायक दोन-तीन खेळाडू दिसत असले, तरी अर्थातच सांघिक कामगिरीने मिळवलेला हा विजय आहे. सामन्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने म्हंटल्याप्रमाणे संघाच्या विजिगीषु वृत्तीने हे पुनरागमन शक्य झाले. मात्र या विजयाने मिळालेल्या आत्मविश्वासाचा उर्वरित सामन्यात भारतीय संघ लाभ उठवू शकेल का आणि ऑस्ट्रेलियन भूमीवरील सलग दुसरा कसोटी मालिका विजय मिळवू शकले, याकडे आता सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्याा –
“अरे अजिंक्य दादा, शुबमनला ३० धावा करू द्यायच्या ना, म्हणजे…” ऑस्ट्रेलियन अँकरची रहाणेकडे खास मागणी
साधं अर्धशतकही करता आलं नाही! तब्बल ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत घडलंय ‘असं’
कॅप्टनकूल नंतर फक्त रहाणे..! बॉक्सिंग डे कसोटी जिंकत अजिंक्यची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी