रांची। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रांचीमध्ये जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना भारताने ५ विकेट्सने जिंकला होता, त्यामुळे भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली आहे. lत्यामुळे दुसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवत मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे, तर न्यूझीलंड संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात काही बदल झालेले दिसून येऊ शकतात.
भारताच्या अंतिम ११ संघात बदलाची शक्यता
या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त झाला होता. फलंदाजाने जोरात मारलेला चेंडू त्याच्या हाताला लागला होता. तरी त्याने त्याचे षटक पूर्ण केले होते. मात्र, आगामी कसोटी मालिका आणि इतर मालिकांचा विचार करता खबरदारी म्हणून सिराजला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते.
त्याच्या जागेवर हर्षल पटेल किंवा अवेश खान यांच्यातील एकाला संधी मिळू शकते. जर, यांच्यातील कोणालाही संधी मिळाली, तर त्यांच्यासाठी हा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना असेल.
त्याचबरोबर वेगवान आक्रमणात भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरवर दुसऱ्या सामन्यासाठी संघव्यवस्थापन विश्वास कायम ठेवण्याची शक्यता आहे. तसेच फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेल आणि आर अश्विन देखील अंतिम ११ जणांच्या संघात कायम राहण्याची शक्यता आहे.
याशिवाय फलंदाजी फळीतही फारसा बदल न दिसण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि इशान किशनला संधी मिळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागू शकते. यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत जबाबदारी संभाळेल, तर अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यर दुसऱ्या टी२० सामन्यातही खेळताना दिसू शकतो.
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारताचा संभावित ११ जणांचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल/अवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या –
ले पंगा! टी२० विश्वचषकातील अशा ५ घटना, ज्यामुळे निर्माण झाले वाद
लक्ष्मणच्या दिमतीला येणार फ्लिंटॉफ-स्टार्क-हेजलवूडला घडवणारा दिग्गज; औपचारिक घोषणा बाकी