---Advertisement---

INDvNZ, 1st Test: अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेली कानपूर कसोटी अनिर्णित; जडेजा-अश्विनचे प्रयत्न व्यर्थ

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 4:33 PM
Team-India
---Advertisement---

कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळला गेला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेला हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. त्यामुळे मालिका ०-० अशी बरोबरी आहे. ९८ व्या षटकानंतर कमी प्रकाशाच्या कारणाने दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचमुळे सामनाही अनिर्णित राहिला. यावेळी न्यूझीलंड ९ बाद १६५ धावांवर खेळत होते.

हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे दोन्ही संघांना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकी ४ गुण देण्यात आले आहेत. ही मालिका कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ स्पर्धेचा भाग आहे.

अश्विन-जडेजाच्या फिरकीत अडकले फलंदाज

अखेरच्या सत्रात न्यूझीलंडला १५९ धावांची गरज होती. मात्र, या सत्राच्या सुरुवातीलाच अक्षर पटेलने हेन्री निकोल्सला ६५ व्या षटकात १ धावेवर पायचीत केले. यानंतर लगेचच कर्णधार केन विलियम्सन ७० व्या षटकात ११२ चेंडूत २४ धावा करुन रविंद्र जडेजा विरुद्ध पायचीत झाला.

यानंतर रचिन रविंद्र आणि टॉम बंडेल यांनी डाव सावरताना सावध पवित्रा घेत खेळ करण्याचा प्रयत्न केला. हे दोघे टिकून खेळत असतानाच बंडेलला आर अश्विनने ७९ व्या षटकात २ धावांवर त्रिफळाचीत करत न्यूझीलंडला सातवा धक्का दिला. यानंतर काईल जेमिसनचा अडथळा जडेजाने ८६ व्या षटकात त्याला ५ धावांवर पायचीत करत दूर केला. ९० व्या षटकात रविंद्र जडेजानेच टीम साऊथीला बाद होते.

मात्र, यानंतर जवळपास ९ षटके अजाज पटेल आणि रचिन रविंद्र यांनी खेळून काढत झुंज दिली. हे दोघेही बचावात्मक खेळत असताना अंधूक प्रकाशामुळे व्यत्यय येऊ लागला. त्यामुळे पंचांबरोबर सातत्याने भारतीय खेळाडूंनी चर्चा केली. भारताला विजयासाठी केवळ १ विकेटची गरज होती. मात्र, ९८ व्या षटकानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला आणि सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ९ बाद १६५ धावा केल्या. रचिन रविंद्र १८ धावांवर आणि अजाज पटेल २ धावांवर नाबाद राहिले.

या डावात भारताकडून रविंद्र जेडेजाने ४ विकेट्स घेतल्या, तर आर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय अक्षर पटेल आणि उमेश यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली.

लॅथमचे अर्धशतक

पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता फलंदाजी केलेली टॉम लॅथम आणि विल्यम सोमरविल यांची जोडी दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर तुटली. ३६ व्या षटकात उमेश यादवने टाकलेल्या चेंडूवर शुबमन गिलने सोमरविलचा अप्रतिम झेल घेतला. त्यामुळे सोमरविल ३६ धावा करुन बाद झाला. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने लॅथमला चांगली साथ दिली. लॅथमने ५१ व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे सामन्यातील दुसरे अर्धशतक आहे.

मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो ५२ धावांवर ५५ व्या षटकात आर अश्विनविरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला रॉस टेलर संघर्ष करताना दिसला. त्याला खेळलेल्या पहिल्या २२ चेंडूवर एकही धाव घेता आली नव्हती. अखेर त्याला रविंद्र जडेजाने २ धावांवर ६४ व्या षटकात पायचीत करत माघारी धाडले. या विकेटबरोबरच दिवसाचे दुसरे सत्र संपले.

दुसऱ्या सत्राखेर न्यूझीलंडने ६३.१ षटकात ४ बाद १२५ धावा केल्या आहेत. केन विलियम्सन २४ धावांवर नाबाद असून आता न्यूझीलंडला अखेरच्या सत्रात विजयासाठी १५९ धावांची गरज आहे, तर भारताला ६ विकेट्सची गरज आहे.

लॅथम-सोमरविल जोडीची झुंज

पाचव्या दिवशी विजयासाठी न्यूझीलंडला २८० धावांची गरज होती, तर भारताला ९ विकेट्सची गरज होती. पाचव्या दिवसाची सुरुवात न्यूझीलंडने ५ व्या षटकापासून आणि १ बाद ४ धावांपासून केली. तसेच चौथ्या दिवसाखेर नाबाद असलेल्या टॉम लॅथमने २ धावांपासून आणि विल्यम सोमरविलने शून्य धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. या दिवशी भारताकडून वृद्धिमान साहाला मानेमध्ये वेदना जाणवत असल्याने केएस भरत राखीव यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरला आहे.

दरम्यान, दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना इशांत शर्माच्या बोटाला लागल्याने तो मैदानाबाहेर गेला होता, त्यामुळे भारतीय गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. पण, इशांत काहीवेळातच मैदानात परतल्याने सर्वांना दिलासा मिळाला.

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच सोमरविल आणि लॅथम या जोडीने चांगली झुंज देत अर्धशतकी भागीदारी रचली. त्यांनी दिलेल्या लढाईमुळे भारताला पहिल्या सत्रात एकही विकेट घेता आली नाही. पहिल्या सत्राखेर न्यूझीलंडने ३५ षटकात १ बाद ७९ धावा केल्या. टॉम लॅथम ३५ धावांवर आणि विल्यम सोमरविल ३६ धावांवर नाबाद खेळत आहे.

न्यूझीलंडला २८४ धावांचे आव्हान

या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३४५ धावा केल्या होत्या. तसेच न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या. त्यामुळे भारताला ४९ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित करत न्यूझीलंडला ४९ धावांच्या आघाडीच्या जोरावर २८४ धावांचे आव्हान दिले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---