न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याचा आज (6 जून) पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये यजमानांच्या दोन खेळाडूंनी शतकी आणि दोघांनी अर्धशतकी खेळी केली आहे. भारत पहिल्या दिवशी चांगल्या स्थितीत असून त्यांनी 3 विकेट्स गमावत 368 धावसंख्या उभारली आहे.
या सामन्यात भारताकडून मानव सुथारचे पदार्पण झाले. तो 2021 मध्ये अक्षर पटेलनंतर कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करणारा पहिलाच ‘स्पेशालिस्ट स्पिनर’ ठरला आहे.
या सामन्यात केएल राहुल आणि यशस्वी जायस्वाल यांनी भारताच्या डावाची सुरूवात चांगली केली. जायस्वाल मात्र 24 धावा करत बाद झाला. त्यानंतर राहुलने साई सुदर्शनसोबत शतकी भागीदारी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 139 धावांची भागीदारी केली. सुदर्शनचे शतक हुकले मात्र त्याने राहुलला चांगली साथ दिली. सुदर्शन 81 (104) धावा करत बाद झाला. तसेच राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 12 वे शतक झळकावले, मात्र तो लगेच बाद झाला. तत्पूर्वी त्याने गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली.
राहुलनंतर ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला. आपला कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना खेळणारा पंत लयीत दिसला. त्याने गिलसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी खेळी केली असून तो 70 चेंडूत 50 धावा करत नाबाद आहे. तसेच गिलनेही त्याचे कसोटीतील सातत्य कायम राखले आहे. त्याने या सामन्यात कर्णधार म्हणून 1000 धावांचा टप्पा गाठला आणि 11 वे कसोटी शतकही पूर्ण केले. तो 103 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहे.
अफगाणिस्तानकडून नांगेयालिया खारोटे या फिरकीपटूने कसोटी पदार्पण केले. या सामन्यात त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज मोहम्मद सलीम सफी ठरला. त्याने जायस्वाल आणि सुदर्शनच्या विकेट्स घेतल्या, मात्र धावाही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात खर्च केल्या. त्याने 13 षटकांत 67 धावा दिल्या.






