क्रिकेटच्या मैदानावरील पारंपारिक विरुद्ध संघ असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रंगतदार होतात. या सामन्यांवेळी प्रेक्षक आणि खेळाडूंमधील उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. यातूनच, सामन्यात अशा काही घटना घडतात, ज्यांची नोंद पुढील काळासाठी वादग्रस्त घटनांमध्ये केली जाते. २१ वर्षापूर्वीच्या अशाच भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्यात घडलेल्या घटनेला पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल-हक याने, भारताचा अव्वल फिरकीपटू आर अश्विन याच्यासोबत केलेल्या चर्चेत उजाळा दिला.
१९९९ चेन्नई कसोटीतील तो वादग्रस्त झेल
अश्विन आणि इंजमाम उल-हक हे यूट्यूबवरील एका कार्यक्रमात भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांविषयी चर्चा करत होते, तेव्हा अश्विनने १९९९ मधील चेन्नई कसोटीचा उल्लेख केला. त्या कसोटीबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, “ती कसोटी म्हणजे मी चेपॉकवर जाऊन पाहिलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावात सौरव गांगुलीने मारलेला चेंडू मोईन खान यांनी सिली पॉईंटवर पकडला होता. मात्र, आम्हाला अजूनही कळले नाही की, तो झेल व्यवस्थित घेतला होता की नाही? कारण, त्यावेळचे कॅमेरे आता इतके प्रगत नव्हते.”
इंजमामने दिले मन जिंकणारे उत्तर
पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या इंजमामने त्या झेलाबद्दल सांगताना म्हटले, “या घटनेत खरंतर मोईन खान आणि अझहर मेहमूद हे दोघे सहभागी होते. सौरवने मारलेला चेंडू प्रथमत: अझहरच्या अंगाला लागला आणि नंतर मोईनने झेल टिपला. मी त्या झेलाबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. कारण, दुसऱ्या डावात माझी तब्येत खराब असल्याने मी मैदानावर नव्हतो. माझ्याच जागी अझहर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात होता. मात्र, मी एक गोष्ट कबूल करतो की, तो झेल शंकास्पद होता.”
अश्विनने केला सॅल्यूट
इंजमामचे उत्तर ऐकून अश्विनला हसू आवरता आले नाही. त्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया देत म्हटले, “इंजी भाई, मी तुम्हाला सॅल्यूट करतो. कारण, तुम्ही खुल्या मनाने कबूल केले की, तो झेल शंकास्पद होता.”
इंजमाम आणि अश्विनने चर्चा केलेली घटना १९९९ मधील चेन्नई कसोटी दरम्यानची होती. भारताला विजयासाठी २७० धावांचे आव्हान मिळाले असताना दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने १३६ धावांची शानदार खेळी केली होती. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या कसोटी सामन्यात पाकिस्तानने भारताचा १२ धावांनी पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ परत येतोय! तंदुरूस्तीबाबतच्या प्रश्नांवर रोहितची दिलखुलास उत्तरे
‘मी १५० ओव्हर टाकल्यात’, टीम इंडियाच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियन फिरकीपटूचे आव्हान