जगतील सर्वात श्रीमंत मानली जाणारी लीग म्हणजे आयपीएल, त्याची सुरुवात २००८ मध्ये झाली. आयपीएलच्या पहिल्या हंगामात एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. आयपीएलचा पहिले विजेतेपद शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंगला पराभूत करत जिंकण्याचा बहुमान मिळविला होता.
महत्वाची गोष्ट ही होती, की वॉर्न आयपीएलमधील कर्णधारांपैकी एकमात्र विदेशी कर्णधार होता. ज्याने पूर्ण हंगामात संघाचं नेतृत्व केलं होतं. पण असेही दोन संघ होते. ज्यांनी चालू हंगामात कर्णधार बदलले होते. पण असं करूनही त्यांच्या संघाला यश मिळाले नाही. प्रत्येक संघात भारतातीलच नव्हे, तर जगभरातील दिग्गज खेळाडू खेळताना पहायला मिळाले. या पहिल्या हंगामात काही संघाचं प्रदर्शन खूपच निराशाजनक राहीले, तर काही संघ चांगलं प्रदर्शन करत उपांत्यफेरीपर्यंत पोहचले.
अस म्हणलं जातं, की कर्णधार हा संघाचा महत्वाचा धागा असतो. जर कर्णधार चांगलं प्रदर्शन करत नसेल, तर त्याचं पद काढून घेतलं जातं. पण असेही काही कर्णधार असतात. जे आपल्या नेतृत्वाच्या जोरावर संघाला विजय मिळवून देतात. प्रत्येकालाच आपल्या आवडत्या कर्णधारांबद्दल जाणून घ्यायला आवडतं. चला तर मग आयपीएल २००८ हंगामातील कर्णधारांबद्दल जाणून घेऊया, की ते कुठे आहेत व काय करतात.
ऍडम गिलख्रिस्ट, व्हीव्हीएस लक्ष्मण- डेक्कन चार्जर्स
आयपीपीएलच्या पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्स संघाचं प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले होते. त्यांना १४ सामन्यांपैकी फक्त दोनच सामन्यात विजय मिळवता आले. आणि १२ सामन्यांत हार पत्करावी लागली. त्यामुळे संघ ४ गुणांसह शेवटच्या स्थानी राहिला. सुरुवातीला संघाचं नेतृत्व व्हीव्हीएस लक्ष्मणकडे होत. पण मधेच ऍडम गिलख्रिस्टकडे (Adam Gilchrist) नेतृत्व सोपविण्यात आलं होतं. त्यानंतर आता लक्ष्मण (VVS Laxman) समालोचनाबरोबरच हैद्राबाद संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे. तर गिलख्रिस्टही समालोचन करत आहे.
राहुल द्रविड – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
तसं पहायला गेलं, तर आयपीएलच्या पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात बरेच दिग्गज खेळाडू होते. असे असूनही संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. या हंगामात आरसीबीला १४ सामन्यांपैकी फक्त ४ सामन्यांत विजय मिळवता आला. आणि १० सामने गमवावे लागले होते.
त्यामुळे ८ गुणांबरोबर ते सातव्या स्थानी राहिले. या हंगामात आरसीबीचं नेतृत्व अनुभवी राहुल द्रविड (Rahul Dravid) कडे होतं. तो त्याचा कर्णधार म्हणून शेवटचा हंगाम होता. त्यानंतर तो भारत अ आणि 19 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक राहिला आहे. तर तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळत आहे.
सौरव गांगुली – कोलकाता नाईट रायडर्स
आयपीएल २००८ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली जबरदस्त सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्याच सामन्यात आरसीबीला मोठ्या फरकाने हरवलं होतं. पण संघ आपला फॉर्म कायम ठेऊ शकला नाही. १४ सामन्यांत त्यांना फक्त ६ विजय मिळवता आले. तर ७ सामन्यांत हार मिळाली. त्यामुळे १३ गुणांसह ते सहाव्या स्थानी राहिले. गांगुलीला (Sourav Ganguly) दुसऱ्या हंगामात कर्णधार पदावरून हटविण्यात आलं. पण नंतर २०१० ला संघाचं नेतृत्व पुन्हा त्याच्याकडे देण्यात आलं. सध्या गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष पद सांभाळत आहे. गांगुली केकेआर व्यतिरिक्त पुणे वॉरिअर्स इंडिया संघाकडून खेळला आहे.
सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग – मुंबई इंडियन्स
आयपीएल २००८ मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा या हंगामातील काही सामने खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत हरभजन सिंगने (Harbhajan Singh) संघाचं नेतृत्व केलं. त्यामध्ये संघाचं प्रदर्शन चांगलं राहिलं होतं. आणि ते उपांत्य सामन्याच्या जवळही पोहचले. पण एक गुण कमी असल्यामुळे त्यांना उपांत्य सामन्यात प्रवेश करता आला नाही.
त्यांनी १४ सामन्यांत ७ विजय मिळवले होते आणि ७ पराभूत झाले होते. त्यामुळे ते पाचव्या स्थानी राहिले. त्यावेळी मुंबईचा कर्णधार राहिलेल्या हरभजनने अजूनही निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे तो आजही आयपीएल मध्ये खेळत आहे, तर सचिन मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक संघाबरोबर आहे. त्याचबरोबर समालोचन ही करत आहे.
विरेंद्र सेहवाग – दिली कॅपिटल्स
आयपीएलच्या पहिल्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स (Delhi Daredevils) (आताची दिल्ली कॅपिटल्स) संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता. त्यांनी १४ मधील ७ विजय मिळवले, तर ६ वेळा पराभूत झाले होते. त्यामुळे १५ गुणांसह चौथ्या स्थानी होते. उपांत्य सामन्यात ते राजस्थान रॉयल्स कडून पराभूत झाले. त्यामुळे त्याचं स्वप्न तिथंच संपुष्टात आलं. त्यावेळी दिल्लीचे नेतृत्व विरेंद्र सेहवागकडे (Virender Sehwag) होतं. निवृत्तीनंतर त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षकपद सांभाळलं आहे. तसेच त्याची एक शाळाही आहे. त्याचबरोबर तो समालोचनही करतो.
एमएस धोनी – चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) पहिल्या हंगामात अंतिम सामन्यांपर्यंत पोहचले होते. पण त्यांना राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्विकारावा लागला. तसेच, उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. त्या हंगामात १४ सामन्यात चेन्नई ८ विजयांसह १६ गुण मिळवून तिसऱ्या स्थानी होते. पहिल्या हंगामात चेन्नई संघाचं नेतृत्व धोनीकडे (MS Dhoni) होतं आणि अजूनही चेन्नईचं नेतृत्व त्याच्याकडेच आहे. सध्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु, तो सध्या चेन्नईकडून आयपीएल खेळत आहे.
युवराज सिंग – किंग्ज इलेव्हन पंजाब
आयपीएल २००८ च्या हंगामात पंजाब संघाचं प्रदर्शन खूप चांगले राहिले होते. त्यांनी उपांत्य सामन्यांपर्यंत मजल मारली होती. पण त्यांना उपांत्य सामन्यात सीएसकेकडून पराभूत स्विकारावा लागला होता. १४ सामन्यात १० विजय मिळवून २० गुणांसह पंजाब संघ दुसऱ्या स्थानी होता. या पहिल्या हंगामात युवराज सिंगकडे (Yuvraj Singh) संघाचं नेतृत्व होते. त्याने संघाला उपांत्य सामन्यांपर्यंत पोहचवलं होतं.
सध्या त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण अजूनही तो टी२० लीगमध्ये खेळत आहे. याव्यतिरिक्त त्याचे YouWeCan नावाचं फाउंडेशन ही आहे. ज्यामध्ये तो व्यस्त असतो.
शेन वॉर्न – राजस्थान रॉयल्स
आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने अपेक्षेपेक्षा चांगलं प्रदर्शन केलं होतं. शेन वॉर्नच्या (Shane Warne) नेतृत्वाखाली १४ सामन्यांत ११ विजय मिळवून २२ गुणांसह ते प्रथम क्रमांकावर विराजमान झाले होते. अंतिम सामन्यात सीएसकेवर मात करून आयपीएलच्या पहिल्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या विजयाचं श्रेय वॉर्नला जातं. त्यानंतर तो आता ऑस्ट्रेलियामध्ये समालोचन करत आहे आणि राजस्थान संघाबरोबरही काम करतोय.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईत कोरोनाचा धोका वाढला तर ‘या’ शहरात खेळवण्यात यावे सामने, दिग्गजाने पुढे केला मदतीचा हात
आयपीएलमध्ये खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास कसे करणार पुनरागमन? जाणून घ्या नियम