जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएईत होणार आहे. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर फ्रंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्ज संघ मागील १ आठवड्यापासून चेन्नईमध्ये होता. त्यानंतर आता काल (२१ ऑगस्ट) सीएसके संघ दुबईला रवाना झाला आहे. या प्रसंगी सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीचाही एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये तो विमानात असलेल्या इतर स्टाफ कर्मचाऱ्याला म्हणत आहे की, तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी इकॉनॉमीमध्ये जाईल.
धोनीचा व्हिडिओ झाला व्हायरल
आयपीएलची तयारी लक्षात घेता सीएसके संघाने चेन्नईतही शिबिराचे आयोजन केले होते. त्यानंतर ते आता दुबईला पोहोचले आहेत. यादरम्यान सीएसकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
या फोटोंमध्ये एक व्हिडिओही चर्चेचा विषय ठरत आहे. जो जॉर्ज नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की कर्णधार धोनीने नेहमीच आश्चर्यचकित केले आहे.
कर्णधार धोनी मला आजही आश्चर्यचकित करतो
व्हायरल होत असलेला व्हिडिओ फ्लाईटदरम्यानचा आहे. जेव्हा संघातील सहकारी एकत्र बसून चर्चा करत असतात आणि व्हिडिओचा फोकस हा धोनीवर आहे, जिथे तो सुरेश रैनाच्या समोर बसला आहे तसेच त्याच्याशी चर्चा करत आहे.
जॉर्जने आपला अनुभव शेअर करत म्हटले की, “ज्या व्यक्तीने सर्वकाही पाहिले आहे, क्रिकेटमध्ये सर्वकाही केले आहे, तो आजही त्याला आश्चर्यचकित करणे सोडत नाही.”
When a man who’s seen it all, done it all in Cricket tells you, “Your legs are too long, sit in my seat (Business Class), I’ll sit in Economy.” The skipper never fails to amaze me. @msdhoni pic.twitter.com/bE3W99I4P6
— George John (@georgejohn1973) August 21, 2020
झाले असे की धोनीने जॉर्जच्या लांब पायांकडे पाहत म्हटले की, “तुम्ही माझ्या सीटवर बसा आणि मी इकॉनॉमीमध्ये जाऊन बसतो.”
सीएसके संघ पोहोचला दुबईत
तसं पाहिलं तर आयपीएल २०२० चा हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. परंतु संघांना एक महिन्याआधीच यूएईला पोहोचावे लागले आहे. कारण कोविड-१९ मुळे मानक प्रणालीचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे धोनी आणि त्याचा संघदेखील दुबईमध्ये आधी आपली चाचणी करतील. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर संघाला ६ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
विशेष म्हणजे आयपीएल २०२० हंगामाचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघात होणार आहे.