---Advertisement---

आयपीएलच्या सर्व संघातील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, जे १३व्या हंगामात करु शकतात कमाल

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 5:52 PM
---Advertisement---

आयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये होणार आहे. पहिल्यांदाच आयपीएल वर्षाच्या अखेरीस होत आहे. आयपीएल म्हटलं की विक्रमांच्या चर्चा तर होणारच. अशाच एका विक्रमाबद्दल.

कोणताही सामना जिंकण्यासाठी उत्तम फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक यांची आवश्यकता असते. परंतु, आयपीएलमध्ये तोच संघ सर्वात चांगले प्रदर्शन करतो, ज्याच्याकडे चांगला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज (शेवटच्या काही षटकात उत्तम गोलंदाजी) उपलब्ध असतो.

या लेखात आयपीएलमधील सर्व ८ संघातील प्रमुख डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. (IPL 2020 Leading Death Over Specialist From Every Team)

क्रिस मॉरिस (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

क्रिस मॉरिस हा एक दमदार अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना शानदार प्रदर्शन केले आहे. मॉरिसची विशेषता ही आहे की, तो क्रिकेटच्या तिन्ही विभागात चांगले प्रदर्शन करण्याची क्षमता बाळगतो. अर्थात तो उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही माहीर आहे.

जर, मॉरिसने त्याच्यातील क्षमतेनुसार या हंगामात प्रदर्शन केले. तर तो नक्कीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून देऊ शकतो. तो आयपीएल २०२० मध्ये आरसीबी संघाचा प्रमुख डेथ ओव्हर गोलंदाज असेल.

भुवनेश्वर कुमार (सनराइजर्स हैद्राबाद) 

भुवनेश्वर कुमार हा एक उत्तम डेथ ओव्हर गोलंदाज आहे. कारण, त्याच्याकडे शेवटच्या काही षटकात यॉर्कर, हळूवार गोलंदाजी, नकल गोलंदाजी करणे असे पर्याय उपलब्ध आहेत. तो भारतीय संघातील सक्रिय वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. भुवनेश्वरने आयपीएल २०१६ आणि १७मध्ये पर्पल कॅप जिंकली आहे. त्याने आयपीएलमध्ये ११७ सामन्यांत ७.२५च्या इकोनॉमी रेटने १३३ विकेट्स घेतल्या आहेत.

जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स)

जोफ्रा आर्चरने इंग्लंडमध्ये नेटवेस्ट टी२० ब्लास्ट आणि ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग असे टी२० टूर्नामेंट खेळले आहेत. त्यामुळे तो टी२० स्पेशलिस्ट आहे. त्याच्यामध्ये शेवटच्या षटकात दमदार गोलंदाजी प्रदर्शन करण्याची क्षमता आहे. आयपीएल २०१८च्या लिलावामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने आर्चरला ७.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने २०१८ आणि २०१९ मध्ये राजस्थानकडून दमदार कामगिरी केली आहे. आर्चरने राजस्थानकडून आतापर्यंत २१ सामने खेळत २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे यंदाही त्याच्या खांद्यावर डेथ ओव्हर गोलंदाजीची जबाबदारी असेल.

मोहम्मद शमी (किंग्स इलेव्हन पंजाब) 

गेल्या २ ते ३ वर्षांत मोहम्मद शमीच्या गोलंदाजीत बरीच सुधारणा झाली आहे. तो सध्या भारतीय संघातील सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील प्रदर्शन दमदार आहे. याबरोबरच त्याने आयपीएलमधील आपल्या किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठीही चांगली कामगिरी केली आहे. गतवर्षी शमीवर पंजाब संघातील डेथ ओव्हर गोलंदाजीची जबाबदारी होती. यंदाही शमीच पंजाबकडून डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल.

जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)

जसप्रीत बुमराहला जगातील सर्वोत्कृष्ठ डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तो दवाबात असतानाही उत्कृष्ट गोलंदाजी करु शकतो. उलट दबावात तो अजूनही घातक गोलंदाजी करतो. त्यामुळे जास्त तर शेवटची षटके टाकण्याची जबाबदारी बुमराहवर असते. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून ७७ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ८२ विकेट्सही घेतल्या आहेत.

दीपक चाहर (चेन्नई सुपर किंग्स)

दीपक चाहरने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत स्वत:मध्ये खूप बदल केले आहेत. तो भारतीय टी२० संघातील सर्वोत्कृष्ट सक्रिय गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने भारताकडून १० टी२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०१९मध्ये चाहरने सीएसकेकडून दमदार गोलंदाजी प्रदर्शन केले होते. सुरुवातीला तो पहिल्या काही षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत असायचा. परंतु, तो आता शेवटच्या षटकातही चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता बाळगतो. त्यामुळे यंदा चाहर हा सीएसके संघाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज असेल.

पॅट कमिन्स (कोलकाता नाईट रायडर्स)

१९ डिसेंबर २०१९ला पॅट कमिन्स जगातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. त्याला आयपीएल २०२०च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने १५.५ कोटींना विकत घेतले होते. तो यापुर्वीही केकेआरचा सदस्य राहिला होता. कमिन्स डेथ ओव्हरमध्ये उत्तम गोलंदाजी करतो. शिवाय त्याच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करणे फलंदाजांना कठीण जाते. त्यामुळे यावेळी केकेआर संघाच्या गोलंदाजीची धुरा तो सांभाळेल.

कागिसो रबाडा (दिल्ली कॅपिटल्स)

कागिसो रबाडा हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीपुढे मोठमोठे फलंदाज आपले गुडघे टेकवतात. रबाडाच्या शानदार गोलंदाजीमुळे मागच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे यंदाही रबाडाकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार. त्याने गतवर्षी १५४.२३ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. त्यामुळे रबाडाच दिल्ली कॅपिटल्स संघाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज असेल.

ट्रेंडिंग लेख –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---