आयपीएल २०२० बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. या मोसमातील पहिला सामना आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होऊ शकतो. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा उद्घाटन सामना होण्याची दाट शक्यता होती. परंतु सीएसके कॅम्पमध्ये आलेल्या कोरोना प्रकरणांमुळे ते सलामीचा सामना खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.
बऱ्याचदा आयपीएलच्या नवीन हंगामाला मागील हंगामातील अंतिम सामन्यात पोहचलेल्या २ संघातील सामन्याने सुरुवात होते, परंतु या हंगामात आपल्याला त्यात बदल दिसू शकतात.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हा उद्घाटन सामना आयोजित करण्याचा विचार करीत आहे.
याबद्दल एका सुत्राने सांगितले ‘आयपीएचा पहिला सामना आरसीबी आणि मुंबई दरम्यान असू शकतो. याचे मोठे कारण म्हणजे सलामीच्या सामन्यात स्टार खेळाडूंचे मैदानवर उतरणे महत्त्वाचे असते. जर एमएस धोनीचा संघ (सीएसके) खेळू शकला नसेल तर तो विराट कोहलीचा संघ(आरसीबी) असावा.’
मागील अनेक दिवसांपासून आयपीएलच्या या हंगामाआधी सतत अडचणी येत आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएलला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार, आयपीएल प्रसारण संघाचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.
आयपीएलचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. स्टारची टीम ३१ ऑगस्टला दुबईला रवाना होणार होती, परंतु एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर सर्व सदस्यांना आता युएईला जाण्यास बंदी घातली गेली आहे. आता उर्वरित लोक एका आठवड्यानंतर दुबईला जातील.
याआधी चेन्नई सुपर किंग्जच्या १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती, यात दोन खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे सीएसके संघाचा क्वारंटाईनमध्ये राहाण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्याचवेळी स्टार फलंदाज सुरेश रैनाने या हंगामातून आपले नाव मागे घेतल्यामुळे आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत सीएसकेचा संघ उद्घाटन सामना खेळु शकण्याची शक्यता नाही कारण त्यांना या परिस्थितीतून बाहेर यायला वेळ लागेल.