दिल्ली कॅपिटल्स संघाला एक धक्का बसला आहे. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असल्याने तो किमान 1 आठवडा खेळू शकणार नाही. याबद्दल दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने रविवारी(11 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यानंतर माहिती दिली.
रिषभला शुक्रवारी(9 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला नाही. मुंबई विरुद्ध दिल्लीला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात रिषभऐवजी अजिंक्य रहाणेला संधी मिळाली होती. तर यष्टीरक्षणाची जबाबदारी ऍलेक्स कॅरेने सांभाळली.
रिषभच्या दुखापतीबद्दल बोलताना अय्यर म्हणाला, “आम्हाला माहित नाही की रिषभ खेळण्यासाठी कधी उपलब्ध होईल. डॉक्टरांनी त्याला एका आठवड्यासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आशा आहे की तो चांगले पुनरागमन करेल.”
रिषभने आत्तापर्यंत यंदाच्या आयपीएल हंगामात 6 सामने खेळला असून त्याने 176 धावा केल्या आहेत. तसेच सध्या दिल्लीचा यंदाच्या आयपीएल हंगामातील प्रवास आत्तापर्यंत चांगला झाला आहे. त्यांनी 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले असून 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.