रविवारपासून (१९ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याला संयुक्त अरब अमिराती येथे सुरुवात होत आहे. दुसऱ्या टप्प्यात पहिलाच सामना हाय व्होल्टेज सामना असणार आहे; म्हणजेच पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्याने पुन्हा एकदा सर्व संघांमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थांनांवर राहण्यासाठी स्पर्धा सुरु होईल.
दुसऱ्या टप्प्यात एकूण ३१ सामने होणार आहेत. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात २९ सामने पूर्ण झाले होते. पण कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्याने आयपीएल २०२१ ला २९ सामन्यांनंतर स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरित ३१ सामने युएईमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएल २०२१ हंगाम स्थगित होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांचे ८ सामने खेळून झाले होते. तर अन्य ६ संघांचे ७ सामने पूर्ण झाले होते.
या २९ सामन्यांनतर कोणता संघ किती सामने जिंकला आहे, किती पराभूत झाला आहे आणि गुणतालिकेत कितव्या स्थानावर आहे, याबद्दल आढावा घेऊ.
१. दिल्ली कॅपिटल्स –
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत १२ गुणांसह आणि +०.५४७ नेटरनरेटसह अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी ८ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत, तर २ सामने त्यांना पराभूत व्हावे लागले आहेत. त्यांना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांविरुद्ध पहिल्या टप्प्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
२. चेन्नई सुपर किंग्स –
तीन वेळचा आयपीएल विजेता संघ चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यानंतर गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे १० गुण असून +१.२७३ नेटरनरेट आहे. त्यांनी ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि २ सामने पराभूत झाले आहेत. त्यांनी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभूत व्हावे लागले आहे.
३. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
चेन्नई सुपर किंग्सप्रमाणेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेही आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यानंतर १० गुण आहेत. मात्र, त्यांचा नेटरनरेट चेन्नईपेक्षा कमी असल्याने ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा नेटरनरेट -०.१७१ आहे. त्यांनी ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यांना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
४. मुंबई इंडियन्स
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यानंतर गुणतालिकेत ७ सामन्यांपैकी ४ सामने जिंकून चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे ८ गुण असून +०.०६२ नेटरनरेट आहे. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या तीन संघाविरुद्ध पराभव स्विकारले आहेत.
५. राजस्थान रॉयल्स
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आहे. त्यांनी ७ पैकी ३ सामने जिंकले आहेत, तर ४ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे ६ गुण आहेत. तसेच त्यांचा नेटरनरेट -०.१९० आहे. त्यांनी दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांविरुद्ध विजय मिळवले आहेत.
६. पंजाब किंग्स
आयपीएल २०२१ हंगामात पंजाब किंग्स या नव्या नावासह सामील झालेल्या या संघाने ८ सामने पहिल्या टप्प्यात खेळले. त्यातील ३ सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला. तर, ५ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबचेही ६ गुण असून ते कमी नेटरनरेटमुळे ६ व्या क्रमांकावर आहेत. त्यांचा -०.३६८ नेटरनरेट आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध विजय मिळवला आहे.
७. कोलकाता नाईट रायडर्स
दोन वेळच्या आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएल २०२१ हंगामात पहिल्या टप्प्यात खराब कामगिरी राहिली. त्यांना ७ पैकी केवळ २ सामने जिंकता आले. त्यामुळे गुणतालिकेत -०.४९४ नेटरनरेटसह आणि ४ गुणांसह कोलकाता संघ सातव्या क्रमांकावर आहे. त्यांनी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स विरुद्ध विजय मिळवले.
८. सनरायझर्स हैदराबाद
यंदा आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यानंतर सर्वात तळाशी राहिलेला संघ सनरायझर्स हैदराबाद ठरला. त्यांना पहिल्या टप्प्यात साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांना केवळ पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवता आला. त्यामुळे ७ पैकी ६ सामने पराभूत झाल्यानंतर केवळ २ गुण आणि -०.६२३ नेटरनरेटसह हैदराबाद ८ व्या क्रमांकावर राहिले.
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वाधिक धावा, सर्वात लांब षटकार, सर्वाधिक विकेट्स, पाहा आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याचा लेखाजोखा
सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिला संघाचा पराभव, पूजा वस्त्राकरची झुंज अपयशी