---Advertisement---

डेथ ओव्हर्समध्ये फसणार का ‘डॅडी आर्मी?’, जाणून घ्या चेन्नई संघाची ताकद आणि कमजोरी

Chennai-Super-Kings
---Advertisement---

जगभरातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेली टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल होय. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक म्हणून चेन्नई सुपर किंग्स संघाचे नाव घेतले जाते. चेन्नईने आतापर्यंत ४ वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे. आयपीएल २०२१ पर्यंत सर्वात अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीमुळे ‘डॅडी आर्मी’ म्हणून ओळखला जाणारा चेन्नई संघ आयपीएल २०२२मध्येही किताबावर नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ यावेळी जरा बदललेला दिसेल. कारण, फ्रँचायझीने लिलावात अनेक युवा खेळाडूंना विकत घेतले आहे. तसेच, अनेक मॅच विनर खेळाडू संघाचा भाग नाहीयेत. संघाचा पहिला सामना २६ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. आयपीएल २०२२ ला सुरुवात होण्यापूर्वी चला जाणून घेऊया चेन्नई संघाची ताकद आणि कमकुवतपणा…

एमएस धोनीपुढे सर्वात मोठे आव्हान
फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis), सुरेश रैना (Suresh Raina), सॅम करन (Sam Curran) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या अनुपस्थितीत संघाला पुन्हा एकदा विजयी जोडी बनवण्याचे मोठे आव्हान असू शकते. डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांच्या जोडीने आपला चांगलाच दबदबा निर्माण केला होता. इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करननेही फलंदाजी आणि गोलंदाजीतून योगदान दिले होते. यानंतर डेथ ओव्हर्समध्ये शार्दुल ठाकूरने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी विकेट्स घेतल्या होत्या. गेल्या हंगामात रैनाचे योगदान फारसे नव्हते, पण त्याच्या उपस्थितीमुळे संघाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची कमतरता भासली नव्हती.

चेन्नई संघाची ताकद
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni). गेल्या दोन हंगामात त्याची बॅट शांत राहिली असेल, पण यष्टीच्या मागील त्याची चपळता याची पूर्तता करते. तो असा कर्णधार मानला जातो, जो आपल्या खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी देतो आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतो. यावेळीही तेच दिसण्याची शक्यता आहे. असे असले, तरी चाहत्यांना तो पुन्हा एकदा षटकार मारताना दिसण्याची इच्छा आहे. तो संघाचे वातावरण अशाप्रकारे तयार करतो, ज्यामुळे खेळाडू आपोआपच त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित होतात.

चेन्नई संघाचा कमकुवतपणा
रणनीती आखण्यात एमएस धोनीचा कोणी हात धरू शकत नाही, असे म्हणतात. तो विरोधी संघाचे दोष ओळखून त्यानुसार रणनीती आखतो. यावेळी त्याला डेथ ओव्हर्सचे अधिक नियोजन करावे लागणार आहे. खरं तर, दीपक चाहर आणि ड्वेन ब्राव्होशिवाय संघात कोणताही अनुभवी वेगवान गोलंदाज नाही. अशा परिस्थितीत त्याला आयपीएलचा कमी अनुभव असलेल्या ख्रिस जॉर्डन आणि ऍडम मिल्नेला आजमावे लागू शकते. १९ वर्षांखालील युवा स्टार अष्टपैलू राजवर्धन हंगारगेकर देखील संघात एक चांगला पर्याय असू शकतो. दीपक चाहर पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे धोनीला आणखी त्रास होऊ शकतो. धोनी एक कुशल कर्णधार आहे, त्याला माहित आहे की, अशा वेळी त्याला काय करावे लागेल.

दीपक चाहर- रवींद्र जडेजा ठरू शकतात एक्स फॅक्टर
चेन्नईने रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) कायम ठेवले होते, तर दीपक चाहरला (Deepak Chahar) तब्बल १४ कोटी रुपयांची बोली लावून संघात परत आणले होते. चाहर गेल्या काही हंगामात संघातील महत्त्वाचा गोलंदाज आहे. कर्णधार आणि व्यवस्थापनाच्या विश्वासाचाही त्याने आदर केला आहे. त्यामुळेच त्याची भारतीय संघातही एन्ट्री झाली आहे, तर दुसरीकडे रवींद्र जडेजा आहे. जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याने अशीच कामगिरी आयपीएलमध्ये केली, तर चेन्नईला विजेतेपद मिळवण्यास मदत होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे का?’, अश्विनला चहलचा प्रश्न; वाचा काय आहे भानगड

‘यंदा आमचे प्रदर्शन जोरदार दिसेल, आमच्याकडे खूप सक्षम संघ’, राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकाची हुंकार

कसोटीच्या चौथ्या डावात आत्तापर्यंत ८ यष्टीरक्षकांनी ठोकलीत शतके; पंत, डिविलियर्ससह आता रिजवानचेही नाव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---