इंडियन प्रीमियर लीग २०२२ या जगातील सर्वात मोठ्या लीगची सुरुवात शानदार झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला दूसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने १४ धावांनी पराभूत केले आहे. दिल्लीचा हा पहिलाच पराभव आहे. आता संघ लखनऊ सुपरजायंट्यविरुद्ध तिसरा सामना खेळणार आहे. दूसरा सामना गमावल्यानंतर दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाॅंटिंग दू:खी झाल्याचे दिसले. त्यांनी सर्व संघांना चेतावणी दिली आहे की पुढील सामन्यात ते एका घातक खेळाडूला संघात घेणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांना आशा आहे की दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्किया लवकरच आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (DC vs LSG) ७ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यासाठी त्याची निवड केली जाईल. पाठीच्या दुखापतीमुळे नॉर्किया गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकापासून प्रतिस्पर्धी क्रिकेटमधून बाहेर आहे.
पाॅंटिंगने शनिवारी (२ एप्रिल) गुजरातविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर म्हटले की, ‘नॉर्कियाने शनिवारी सकाळी सरावादरम्यान त्याच्या पूर्ण क्षमतेने गोलंदाजी केली. त्याला त्याच्या पूर्ण क्षमतेने चार ते पाच स्पेल करावे लागतील. मला वाटते की त्याला क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची परवानगी दिली जाईल. आमच्या पूढील सामन्यासाठी काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे आशा आहे की तो पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.’
ऑस्ट्रेलियाच्या डेविड वाॅर्नर आणि मिशेल मार्श यांच्याबाबत विचारले गेले असता पाॅंटिंग म्हणाला, ‘वाॅर्नर मुंबईमध्ये दाखल झाला आहे. मिशेल मार्श मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये असून तो क्वारंटाईन आहे.’ मार्शचा क्वारंटाईन कालावधी समाप्त झाला आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मार्श १० एप्रिलला कोलकाताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. पाकिस्तान दौऱ्यावर त्याला दूखापत झाली होती, त्यानंतर तो सरावानंतर निवडीसाठी उपलब्ध असणार आहे.’ त्याने आयपीएलमध्ये २४ सामन्यांत ३४ विकेट्स घेतल्या आहेत.