आयपीएल २०२२ ची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स आमने सामने आहेत, जो मुंबईच्या वानखडे स्टेडियममध्ये खेळला जाईल. पण, या पहिल्या सामन्यापूर्वी सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने चाहत्यांना निराश करणारी एक बातमी दिली. आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आहे. आता भारतीय संघाचा दिग्गज विराट कोहलीनेही धोनीच्या या निर्णयानंतर सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) २००८ म्हणजेच आयपीएलचा पहिल्या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पहिल्या सामन्यापासून सीएसकेचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करणाऱ्या धोनीचे भारतासह जगभरात असंख्य चाहते आहेत. अशात त्याने सीएसकेचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांमध्ये दुःखाची जणू एक लाट उसळली आहे. धोनीच्या या निर्णयानंतर त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी भावनिक पोस्ट केल्या आहेत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचाही समावेश आहे.
विराट आणि धोनीची मैत्री खूप जवळची आहे. धोनीने भारताचे कर्णधारपद सोडण्यापूर्वी त्याने विराटला संघाचे नेतृत्व करण्यासाठी तयार केले होते. विराटनेही कर्णधाराच्या रूपात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने सोशल मीडियावर लिहिले की, “पिवळ्या जर्सीतील उत्कृष्ट कर्णधाराचा कार्यकाळ संपला. एक असा अध्याय जो चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. तुझ्यासाठी नेहमी सन्मान राहील.” पोस्टमध्ये विराटने धोनीसोबत गळाभेट घेतल्याचा फोटोही पोस्ट केला आहे.
Legendary captaincy tenure in yellow skip. A chapter fans will never forget. Respect always. ❤️💛 @msdhoni pic.twitter.com/cz5AWkJV9S
— Virat Kohli (@imVkohli) March 24, 2022
भारताचा दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजा आता धोनीच्या जागी सीएसकेचा कर्णधार बनला आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा जडेजा एखाद्या आयपीएल संघाचे नेतृत्व करत आहे. धोनीच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने सर्वाधिक २०४ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे आणि सर्वाधिक १२१ सामने जिंकले आहेत. ८२ सामन्यांमध्ये त्याच्या नेतृत्वातील संघ पराभूत झाला, तर राहिलेला एक सामना हा अनिर्णीत राहिला. त्याच्या नेतृत्वातच चेन्नईने ४ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
Video: जेव्हा एमएस धोनीने ‘असं’ करत केली होती जडेजाची बत्ती गुल; खुद्द ‘जड्डू’ही झालेला हँग
डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच! पॅट कमिन्सनं पाकिस्तानच्या अझर अलीला ‘असं’ धाडलं तंबूत, व्हिडिओ पाहाच
IPL 2022: फक्त २ कॅच आणि धोनी होणार टी२० क्रिकेटमधील ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील