गल्लीपासून दिल्लीपर्यंत खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळाचा दिलखुलास आनंद लहानगे आणि जाणते अगदी आवडीने लुटतात. 18 एप्रिल, 2008 रोजी सुरू झालेला इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा हंगाम गेली 15 वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. दिग्गजांनी सामन्यांमध्ये केलेले विक्रम मोडण्यासाठी खेळाडूंची हंगामांमधील आगेकुच ही कायमच पाहण्याजोगी असते. 31 मार्चपासून सुरु झालेला आयपीएल 2023चा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वळत आहे. स्पर्धेतील 57वा सामना शुक्रवारी (दि. 12 मे) रोजी मुंबईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स संंघात खेळला जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यात विशेष काय? हेच तर खरे गुपीत आहे. चला तर आपण हे गुपीत जाणून घेऊयात.
प्लेऑफमध्ये कोण करणार प्रवेश?
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा 57वा सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. हा सामना आपल्या नावावर करत प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याचा गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) इरादा असणार आहे. त्याचवेळी मुंबई संघ टायटन्सला हरवून प्ले-ऑफमधील आपला दावा मजबूत करण्याची मनीषा ठेवेल. तसेच, या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे.
मुंबईसाठी 12 तारीख आहे खास
तारीख सुद्धा खास ठरु शकते यावर बऱ्याच जणांचा विश्वास नसतो, पण हे खरं आहे. होय, आयपीएलच्या इतिहासामध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) संघासाठी 12 मे ही तारीख काहीशी खास आहे. या दिवशी मुंबईचा माजी फलंदाज कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याचा वाढदिवस असतो. शिवाय, पोलार्डच्या वाढदिवसानिमित्त मुंबईचा संघ आजपर्यंत एकही सामना हरलेला नाही. दरम्यान, 12 मे रोजी मुंबईने 2009 मध्ये पहिल्यांदा सामना खेळला होता आणि त्यावेळी पोलार्डचे आयपीएलमध्ये पदार्पण झालेले नव्हते. मात्र, त्यानंतर सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात एमआयने किंग्ज इलेव्हन पंजाबला 8 विकेट्सने धूळ चारली होती. तेव्हापासून सुरू झालेला हा 12 मेचा सिलसिला कायम आहे.
आयपीएलमध्ये मुंबईच्या विजयाच्या मालिका सुरू झाल्या. गेल्या वर्षी 12 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामनाही एमआयने आपल्या नावे केला होता. एकंदरीत पाहता, पोलार्ड त्याच्या वाढदिवसाच्या ( Kieron Pollard Birthday Special) दिवशी त्याच्या संघासाठी भाग्यवान ठरतो आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुंबई संघ टायटन्सविरुद्ध विजयाची नोंद करू शकतो की, नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
एमाआयचा फलंदाजी प्रशिक्षक पोलार्ड
वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने मुंबईकडून 13 हंगाम खेळले आहेत. तो 2010 मध्ये एमआय संघात सामील झाला आणि आयपीएलमधून निवृत्त होईपर्यंत या संघाकडूनच खेळला. अनेक विक्रम आपल्या नावावर करण्याऱ्या पोलार्डने काहीसा खास आणि आगळा वेगळा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. पोलार्डला एकनिष्ट म्हणण्यामागील कारण असे की, एकाच संघाकडून खेळणाऱ्या जगातील मोजक्या क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये पोलार्डचे नाव गणले जाते. शिवाय, पोलार्डच्या कार्यकाळात आत्तापर्यंत मुंबईने 5 वेळा आयपीएलच्या विजयचिन्हावर आपले नाव कोरले आहे. अलीकडेच पोलार्डने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांनतर त्याला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या जागी नेमण्यात आले, तर मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय, त्याने 13 हंगामामध्ये मुंबईसाठी 3412 धावा केल्या असून त्यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पोलार्डचे 36व्या वर्षात पदार्पण! टी20 क्रिकेटमध्ये ‘असा’ विक्रम करणारा जगातला एकमेव पठ्ठ्या
धोनी-रैनाच्या विक्रमाचा पाठलाग करतोय यशस्वी! केकेआरला चोपत जडेजाला सोडले मागे