मैदानातील सर्व बाजूंना फटके मारण्याची क्षमता असल्यामुळे सूर्यकुमार यादव याला चाहते ‘मिस्टर 360’ या नावाने पुकारतात. अशीच 360 डिग्री फलंदाजी सूर्याने मंगळवारी (दि. 9 मे) वानखेडे स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध केली. आयपीएल 2023च्या 54व्या सामन्यात मुंबई विरुद्ध बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यात बेंगलोरने मुंबईला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान गाठण्यात मुंबईकडून सूर्याने जबरदस्त फटकेबाजी करत सर्वांची मने जिंकली. यावेळी भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी सूर्यकुमारचे कौतुक केले.
सूर्यकुमारची फलंदाजी पाहून गावसकरांना झाली गल्ली क्रिकेटची आठवण
टी20 क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज हे बिरुद मिळवणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची फलंदाजी पाहून माजी खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना गल्ली क्रिकेटची आठवण झाली. सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्यांनी म्हटले की, “स्काय गोलंदाजांसोबत पंगा घेत आहे. जेव्हा तो अशाप्रकारे फलंदाजी करतो, तेव्हा तुम्हाला गल्ली क्रिकेटची आठवण होते. तो सराव आणि कठोर मेहनतीने चांगला झाला आहे. त्याचा खालील हात इतका ताकदीचा आहे की, तो याचा पूर्णत्वासाठी वापर करतो. आरसीबीविरुद्ध त्याने चांगली सुरुवात केली.”
नेहाल वढेरानेही जिंकले गावसकरांचा मन
सूर्यकुमार यादव याच्याव्यतिरिक्त नेहाल वढेरा (Nehal Wadhera) या युवा खेळाडूनेही शानदार खेळी साकारली. त्याने संघासाठी 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तसेच, 35 चेंडूत 83 धावा करणाऱ्या सूर्यकुमारची साथ दिली. त्याची खेळी पाहून गावसकरही खुश झाले. ते म्हणाले की, “जेव्हा तुम्ही सूर्यासोबत फलंदाजी करता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. मात्र, नेहाल वढेराच्या खेळीची सर्वात चांगली बाब अशी की, तो सूर्यासारखे शॉट खेळण्याचा विचार करत नव्हता. त्याच्याबाबत ही चांगली गोष्ट आहे की, तो संतुलित होता. शानदार.”
मुंबईने असा जिंकला सामना
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील 54व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेल (68) आणि फाफ डू प्लेसिस (65) यांच्या अर्धशतकाच्या मदतीने आरसीबीने 6 विकेट्स गमावत 199 धावा केल्या होत्या. हे आव्हान मुंबईने सूर्यकुमार यादव (83) आणि नेहाल वढेरा (नाबाद 52) यांच्या खेळीच्या जोरावर 16.3 षटकातच पार केले. सूर्याने यादरम्यान त्याचे आयपीएलमधील 3000 धावाही पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. (ipl 2023 mi vs rcb suryakumar yadav was playing gully cricket says legend cricketer sunil gavaskar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वढेराच्या षटकारामुळे टाटा टियागोचे नुकसान, तरीही टाटाच देणार 5 लाख रुपये, ‘हे’ आहे कारण
फिट असतानाही केकेआरसाठी शार्दुल का करत नाही गोलंदाजी? स्वतःच केला महत्त्वपूर्ण खुलासा