आयपीएल 2024 च्या 49व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसमोर पंजाब किंग्जचं आव्हान होतं. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं 20 षटकांत 7 गडी गमावून 162 धावा केल्या होत्या. 163 धावांचं लक्ष्य पंजाबनं 17.5 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.
पंजाबकडून जॉनी बेयरस्टोनं 30 चेंडूत सर्वाधिक 46 धावांची खेळी खेळली. त्यानं 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. रिले रॉसो अवघ्या 23 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. त्यानं 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली होती. प्रभसिमरन सिंग चौथ्या षटकात 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर रॉसो आणि बेयरस्टो यांच्यात 64 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीमुळे चेन्नई सामन्यातून बाहेर फेकली गेली. कर्णधार सॅम करन 26 आणि शशांक सिंह 25 धावा करून नाबाद राहिले.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं 7 गडी गमावून 162 धावा केल्या. चेन्नईनं चांगली सुरुवात केली. परंतु हरप्रीत ब्रारनं डावाच्या 9व्या षटकात दोन बळी घेत त्यांचं कंबरडे मोडलं. त्यानंतर चेन्नईनं 107 धावांवर 4 विकेट गमावल्या. त्यावेळी संघाची अवस्था बिकट दिसत होती. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाडनं एका टोकाला चिवट फलंदाजी करत संघाला सांभाळलं. ऋतुराज 48 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. त्याच्या अर्धशतकामुळे चेन्नई सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचली.
अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेला महेंद्रसिंह धोनी 11 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. या आयपीएल मध्ये तो पहिल्यांदाच बाद झाला आहे. पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चहरनं 2-2 बळी घेतले. तर कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग यांना 1-1 विकेट मिळाली.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया
चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, प्रशांत सोळंक
महत्त्वाच्या बातम्या –
36 वर्षाच्या खेळाडूनं आयपीएलमध्ये पदार्पण करून रचला इतिहास! चेन्नईच्या प्लेइंग 11 मध्ये मिळाली जागा