आयसीसीनं बुधवारी फलंदाजांची टी20 क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं मोठी झेप घेतली आहे. तो आयसीसी टी20 क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अजूनही अव्वल स्थानावर कायम आहे.
बाबर आझमला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा फायदा झाला. 2-2 ने बरोबरीत सुटलेल्या या मालिकेत बाबर आझमनं 31 ची सरासरी आणि 138 च्या स्ट्राईक रेटनं 125 धावा ठोकल्या. बाबर आझमचे सध्या 763 गुण आहेत. गेल्या वर्षी तो क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादवनं त्याच्याकडून खूर्ची हिसकावून घेतली होती.
या क्रमवारीत इंग्लंडचा फिल सॉल्ट 802 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान 784 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमला एका स्थानाचा फटका बसला. तो एक स्थान घसरून पाचव्या स्थानावर आला आहे. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल सहाव्या क्रमांकावर आहे. सूर्या आणि जयस्वाल यांच्याशिवाय इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आलेलं नाही.
आयसीसी टी20 फलंदाजांची क्रमवारी
सूर्यकुमार यादव – 861 गुण
फिल सॉल्ट – 802 गुण
मोहम्मद रिझवान – 784 गुण
बाबर आझम – 763 गुण
एडन मार्करम – 755 गुण
यशस्वी जयस्वाल – 714 गुण
रिले रॉसो – 689 गुण
जोस बटलर – 680 गुण
रीझा हेंड्रिक्स – 660 गुण
डेव्हिड मलान – 657 गुण
गोलंदाजांच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडचा आदिल रशीद पहिल्या स्थानावर कायम आहे. टॉप टेनमध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. फिरकीपटू अक्षर पटेल 660 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर रवी बिश्नोई 659 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत बांग्लादेशचा शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ वानिंदू हसरंगा आणि मोहम्मद नबी यांचा क्रमांक लागतो. भारताकडून टॉप 10 मध्ये केवळ हार्दिक पांड्या (7) आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मयंक यादव पुन्हा जखमी झाल्यानं संतापला ब्रेट ली, लखनऊच्या मॅनेजमेंटला धरलं जबाबदार