कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना 23 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर खेळला गेला. सनरायजर्सचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम केकेआरला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. कोलकाताच्या संघानं पहिल्या 10 षटकांत अत्यंत संघर्ष केला. मात्र शेवटच्या 10 षटकांत आंद्रे रसेलच्या झंझावातानं संघानं 208 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात केवळ आंद्रे रसेलचाच जलवा दिसला नाही, तर एका अशा खेळाडूनही अर्धशतक ठोकलं ज्याला लिलावात कोणत्याही फ्रँचायझीनं विकत घेतलं नव्हतं! या खेळाडूचं नाव आहे फिल सॉल्ट.
फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी कोलकाता नाईट रायडर्ससाठी डावाची सुरुवात केली. संघाला सर्वात जास्त गरज होती तेव्हा सॉल्ट क्रीजवर टिकून राहिला. एका टोकाकडून सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांसारखे फलंदाज विकेट फेकत होते. अशा परिस्थितीत सॉल्टनं जबाबदारी स्वीकारली आणि 40 चेंडूत 53 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या महत्त्वपूर्ण खेळीत त्यानं 3 चौकार आणि 3 षटकारही मारले.
विशेष म्हणजे, डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावात इंग्लंडच्या फिल सॉल्टवर कोणत्याही फ्रँचायझीनं बोली लावली नव्हती. मात्र इंग्लंडचा दुसरा खेळाडू जेसन रॉय यानं वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मधून आपलं नाव काढून घेतलं, ज्यानंतर सॉल्टला संधी मिळाली. केकेआरनं रॉयला लिलावात त्याची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. त्याच्या जागी कोलकातानं बदली खेळाडू म्हणून फिल सॉल्टला संघात आणलं. आता सॉल्टनं पहिल्याच सामन्यात 53 धावांची आक्रमक इनिंग खेळून आपली उपयोगिता सिद्ध केली आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, केकेआरनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 208 धावा केल्या. आंद्रे रसेलनं 25 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं झंझावती 64 धावा ठोकल्या. रमनदीप सिंगनं 17 चेंडूत 35 धावा ठोकल्या. तर रिंकू सिंहनं 15 चेंडूत 23 धावांचं योगदान दिलं. हैदराबादकडून टी नटराजननं 32 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या प्रत्येक फलंदाजानं चांगली सुरुवात केली, मात्र ते याचं मोठ्या धावसंख्येत रुपांतर करू शकले नाही. संघाकडून हेन्री क्लासेननं 29 चेंडूत सर्वाधिक 63 धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज 50 धावांचा आकडा गाठू शकला नाही. केकेआरकडून हर्षित राणानं 33 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. हैदराबादची टीम 20 षटकात 7 गडी गमावून 204 धावाच करू शकली आणि केकेआरनं सामना 4 धावांनी खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
KKR vs SRH । हर्षित राणा ठरला हिरो! शेवटच्या चेंडूवर केकेआरची हैदराबादवर मात
हर्षित राणाचा जलवा! अनुभवी मयंक अगरवालची विकेट घेतल्यानंतर दिला फ्लइंग किस । VIDEO
गुजरात टायटन्स समोर मुंबई इंडियन्सचं आव्हान! पाहा दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी