---Advertisement---

अक्षर पटेल नवा दोषी, सामना जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारावर बीसीसीआयची कठोर कारवाई

On: मंगळवार, मे 12, 2026 11:47 AM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये सोमवारी (११ मे) पुन्हा एकदा चाहत्यांना मोठ्या धावसंख्येच्या सामन्याचा आनंद घेता आला. हिमाल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, धर्मशाला येथे खेळण्यात आलेल्या हंगामातील ५५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा पराभव करत प्लेऑफ्सच्या आशा कायम ठेवल्या आहेत, मात्र त्यांचा कर्णधार अक्षर पटेलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शिक्षा केली आहे.

बीसीसीआयने अक्षरला पंजाब विरुद्ध षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल शिक्षा केली आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत दिल्लीचा हा या हंगामातील पहिलाच गुन्हा असल्याने अक्षरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या हंगामात अनेक कर्णधारांना संथ गतीने षटके टाकल्याने दंडीत केले आहे. यामुळे हा हंगाम धीम्या षटकगतीमुळे गाजला असून सामन्यांदरम्यान होणारा उशिर कायम आहे. अक्षरच्या आधी शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या या सर्वांना दंड ठोठावण्यात आला आहे.

पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्याची स्थिती पाहिली तर दिल्लीने २११ धावसंख्येचे लक्ष्य पार करत तीन विकेट्सने हा सामना जिंकला. त्यामध्ये अक्षरने प्रभावी फलंदाजी केली. त्याने आपली या हंगामातील सर्वात मोठी खेळी केली. त्याने ३० चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. हे त्याचे या हंगामातील पहिले अर्धशतक ठरले. त्याला डेव्हिड मिलरने चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६४ (३४) धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. मिलरने ५१ (२८) धावा केल्या.

तत्पूर्वी पंजाबकडून प्रियांश आर्य (५६) आणि श्रेयस (५९*) यांनी अर्धशतके केली. सूर्यांश शेडगेच्या ८ चेंडूंत नाबाद २१ धावा आणि कूपर कॉनोलीच्या ३८ धावा यामुळे पंजाबने २० षटकांत ५ विकेट्स गमावत २१० धावा केल्या होत्या.

या विजयानंतर दिल्लीकडे प्लेऑफ्समध्ये पात्र होण्याची संधी आहे. त्यांचे १२ सामन्यांत १० गुण आहेत. गुणतालिकेत पंजाब चौथ्या आणि दिल्ली सातव्या स्थानावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---