इंडियन प्रीमियर लीग म्हणजे जगातील सर्वात मोठी आणि सर्वांची आवडती टी२० लीग. या लीगमध्ये खेळणाऱ्या संघांपैकी एक म्हणजे ‘दिल्ली कॅपिटल्स’. दिल्ली कॅपिटल्स संघासमोर एक मोठी संधी येऊन ठेपली. त्यांना आपल्या मागील १३ वर्षांच्या आयपीएल इतिहासात कधी चौथ्या तर कधी शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले होते. कधीही न संपवता आलेला दुष्काळ यावर्षी संपवण्याची संधी मिळाली. ती संधी म्हणजेच आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरण्याची. परंतु त्यांना यंदा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. पण या राजधानी एक्स्प्रेसचा १३ वर्षांतील अंतिम सामन्याचा प्रवास कसा होता? याबद्दल आपण जाणून घेऊया.
पहिल्याच हंगामात गाठली प्लेऑफ
आयपीएलचा भक्कम पाया २००८ साली रोवण्यात आला. या टी२० लीगमध्ये इतर ८ संघांमध्ये दिल्ली डेअरडेविल्स (आताचे दिल्ली कॅपिटल्स) संघानेही आपले पाऊल ठेवले. या हंगामात दिल्ली संघाने १४ पैकी ७ सामने आपल्या खिशात घालत प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले. इथे त्यांना उपांत्य फेरीपर्यंतच प्रवास करता आला.
दुसऱ्या हंगामातही पुनरावृत्ती
दिल्ली संघाने पहिल्या हंगामानंतर २००९ च्या दुसऱ्या हंगामातही जबरदस्त प्रदर्शन केले. त्यांनी हंगामातील १४ सामन्यांपैकी ७ सामने जिंकत इथेही उपांत्य फेरी गाठली. परंतु त्यांना त्यापुढे पाऊल टाकता आले नाही.
तिसऱ्या हंगामात हाती आले पाचवे स्थान
पहिल्या दोन हंगामात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दिल्लीची गाडी २०१० मध्ये म्हणजेच आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात कुठेतरी डगमगताना दिसली. त्यांनी या हंगामातही पहिल्या २ हंगामाप्रमाणे १४ सामन्यांपैकी ७ सामन्यात विजय मिळवला. परंतु त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
चौथा हंगाम लईच वाईट, दहाव्या स्थानावर घसरण
आयपीएल २०११ चा चौथा हंगाम पहिल्या तीन हंगामांपैकी वेगळा होता. कारण या हंगामात एकूण १० संघ होते, तर पूर्वीच्या हंगामात केवळ ८ संघांचा समावेश होता. या चौथ्या हंगामात दिल्लीची गाडी एकदमच रूळावरून खाली घसरली होती. त्यांना या हंगामात १४ पैकी केवळ ४ सामन्यात विजय मिळवता आला होता, तर ९ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांना दहाव्या स्थानावर जावे लागले होते.
पाचव्या हंगामात पुन्हा गाठली प्लेऑफ
आयपीएल २०१२ च्या पाचव्या हंगामात दिल्लीने चांगले पुनरागमन केले होते. त्यांनी या हंगामातील १६ सामन्यांतील ११ सामन्यात विजय मिळवला होता, तर उर्वरित ५ सामन्यात पराभव स्विकारला होता. या हंगामात त्यांनी थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. परंतु तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला आणि अंतिम सामन्यात जाण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.
सहाव्या हंगामात तळात
पाचव्या हंगामात चमकदारी कामगिरी केल्यानंतर दिल्ली पुन्हा पुढील वर्षी २०१३ सालच्या सहाव्या हंगामात तळात गेली. या हंगामात एकूण ९ संघांनी सहभाग घेतला होता. त्यांनी या हंगामात एकूण १६ सामने खेळले होते. त्यात त्यांना केवळ ३ सामन्यात विजय मिळाला होता, तर उर्वरित १३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
सातव्या हंगामातही शेवटीच
आयपीएल २०१४ च्या सातव्या हंगामापासून केवळ ८ संघांमध्ये स्पर्धा रंगू लागल्या. इथेही दिल्ली संघाला अपयशाचा सामना करावा लागला. या हंगामात तर दिल्ली पूर्ण पण थंडगार पडली होती. त्यांना हंगामातील १४ सामन्यात केवळ २ सामने जिंकता आले, तर उर्वरित १२ सामन्यात मोठा पराभव स्विकारावा लागला होता. या हंगामात ते ८ व्या स्थानी होते.
आठव्या हंगामात सातवे स्थान
मागील हंगामाच्या तुलनेत दिल्ली आयपीएलच्या आठव्या हंगामात केवळ १ स्थान वर आली होती. त्यांना या हंगामात १४ सामने खेळताना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. सोबतच उर्वरित ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दिल्लीने या हंगामात १ स्थानाची कमाई करत सातवे स्थान पटकावले होते.
नवव्या हंगामात मिळवले सहावे स्थान
आयपीएल २०१६ च्या नवव्या हंगामात अंतिम सामन्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या दिल्ली संघाला पुन्हा अपयशाचा सामना करावा लागला. या हंगामात त्यांना सहावे स्थानावर समाधान मानावे लागले. या हंगामात त्यांनी १४ सामने खेळताना ७ सामन्यात विजय, तर ७ सामन्यात पराभव स्विकारावा लागला.
दहाव्या हंगामातही ‘जैसे थे’
दिल्लीसाठी २०१७ चा दहावा आयपीएल हंगामही नवव्या हंगामाप्रमाणे ‘जैसे थे’ राहिला. त्यांनी या हंगामातही सहावे स्थान गाठले. या हंगामात त्यांना १४ सामने खेळताना ६ सामन्यात विजय आणि ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
राजधानी एक्स्प्रेस अकराव्या हंगामात रूळावरून खाली
दिल्लीसाठी अकरावा हंगाम निराशादायी ठरला. त्यांना या हंगामातही अंतिम सामन्यात पोहोचता आले नाही. आणि त्यांची गाडी रूळावरून खाली घसरली. त्यांनी या हंगामात १४ सामने खेळताना ५ सामन्यात विजय मिळवला, तर उर्वरित ९ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या हंगामात ते आठव्या स्थानी होते.
बाराव्या हंगामात दिल्लीची प्लेऑफमध्ये धडक
दिल्ली संघाने आयपीएल २०१९ च्या बाराव्या हंगामात चांगली कामगिरी केली. इथे त्यांनी मागील हंगामातील चुका सुधारल्या. परंतु त्यांना अंतिम सामन्यात स्थान मिळवता आले नाही. त्यांना या हंगामात १४ सामने खेळताना ९ सामन्यात विजय, तर उर्वरित ५ सामन्यात पराभव स्विकारावा लागला.
दिल्लीचा गेल्या १३ वर्षातील प्रवास-
आयपीएल २००८- उपांत्य फेरी
आयपीएल २००९- उपांत्य फेरी
आयपीएल २०१०- ५ वे स्थान
आयपीएल २०११- १० वे स्थान
आयपीएल २०१२- उपांत्य फेरी
आयपीएल २०१३- ९ वे स्थान
आयपीएल २०१४- ८ वे स्थान
आयपीएल २०१५- ७ वे स्थान
आयपीएल २०१६- ६ वे स्थान
आयपीएल २०१७- ६ वे स्थान
आयपीएल २०१८- ८ वे स्थान
आयपीएल २०१९- उपांत्य सामना
आयपीएल २०२०- उपविजेता