शुक्रवारी(15 ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने राजीनामा दिला. त्यामुळे त्याच्याऐवजी आता इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गनला कोलकाताच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मॉर्गन हा कोलकाताचा 5 वा कर्णधार आहे. त्याच्याआधी सौरव गांगुली, ब्रेंडन मॅक्यूलन, गौतम गंभीर आणि कार्तिक यांनी कोलकाताच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. आता मॉर्गन 2020च्या आयपीएल हंगामातील उर्वरित 7 सामन्यांत कोलकाताचे नेतृत्व करताना दिसेल.
याआधीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत की संघांनी त्यांचे कर्णधार आयपीएल हंगामाच्या मध्येच बदलले आहेत, किंवा खेळाडूंनीच चालू हंगामात कर्णधारपद सोडले आहे. नेतृत्वबदल करण्यामागे अनेक कारणे आहेत. कधी कार्तिकप्रमाणे आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तर कधी संघाच्या खराब कामगिरीमुळे खेळाडूंनी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
जर आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून पाहिले तर संघाच्या खराब कामगिरीमुळे आयपीएल हंगाम सुरु असतानात कर्णधारपद सोडण्याच्या यादीत कुमार संगकारा, केवीन पीटरसन, व्हीव्हीएस लक्ष्मण अशा दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे.
2008 ला व्हीव्हीएस लक्ष्मणने डेक्कन चार्जर्सचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर डेक्कनचा ऍडम गिलख्रिस्ट नविन कर्णधार झाला. त्याच्या नेतृत्वाखाली नंतर 2009 ला डेक्कनने आयपीएलचे विजेतेपदही मिळवले. त्यानंतर केविन पीटरसनने 2009ला रॉयल चँलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद सोडले होते. या नंतर अनिल कुंबळे बेंगलोरचा नवीन कर्णधार झाला. त्याच्या नेतृत्वाखाली 2009ला बेंगलोर उपविजेते ठरले होते.
2012 ला कुमार संगकाराने डेक्कन चार्जर्सचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर कॅमेरॉन व्हाईट डेक्कनचा नविन कर्णधार झाला. तसेच 2013 च्या आयपीएल हंगामादरम्यान डॅनियल विट्टोरीने बेंगलोरचे कर्णधारपद मुथय्या मुरलीधरनला 11 जणांच्या संघात स्थान देण्यासाठी सोडले होते. त्याच्यानंतर विराट कोहलीने बेंगलोरच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली, जी तो अजूनही सांभाळत आहे.
त्याआधी 2012 च्या हंगामादरम्यान सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी हरभजन सिंगला मुंबईचा कर्णधार करण्यात आले होते. 2011 ला मुंबईने हरभजनच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले होते.
त्यानंतर 2013 ला पुन्हा एकदा हरभजनच्या ऐवजी रिकी पाँटिंगला कर्णधारपद बहाल करण्यात आले. पण हा हंगाम सुरु असताना पाँटिंगने कर्णधारपद सोडून रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली. त्यानंतरचा इतिहास तर सर्वांना परिचीत आहे. 2013 ला मुंबईने पहिल्यांदा रोहितच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले. पुढे मुंबईने एकूण 4 आयपीएल विजेतीपदे रोहितच्या नेतृत्वाखाली मिळवली आहेत.
2014 ला शिखर धवन सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार होता. पण त्यानेही नंतर ही जबाबदारी डॅरेन सॅमीकडे सोपवली. तर 2015 ला शेन वॉटसनने राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोडून स्टिव्ह स्मिथकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. असेच 2016 ला डेविड मिलरने किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व सोडले. त्यानंतर मुरली विजयला पंजाबचा कर्णधार करण्यात आले. पण तरीही त्यावेळी संघ तळातील क्रमांकावरच राहिला.
2018 ला आयपीएल हंगाम सुरु असतानाच गौतम गंभीरने दिल्ली संघाचे खराब कामगिरी झाल्याने कर्णधारपद सोडले. त्याच्याऐवजी त्यावेळी श्रेयस अय्यरला कर्णधार करण्यात आले. दिल्ली संघाने मागील 2 हंगामात अय्यरच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर 2019 च्या हंगामात खराब कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरुन हटवत स्मिथकडे कर्णधारपद सोपवले होते. पण स्मिथच्या नेतृत्वाखालीही राजस्थानची कामगिरी खास झालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
याला म्हणतात अंदाज! कार्तिकच्या पायउतार होण्याची भविष्यवाणी झाली होती १२ दिवस आधीच
मुंबईप्रमाणेच कोलकाताही होणार आयपीएल विजेते? पाहा आकडेवारी काय सांगते
मोठी बातमी! दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार; मॉर्गन कोलकाताचा नवा कर्णधार
ट्रेडिंग लेख –
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण