दिल्ली कॅपीटल्स संघाचा सलामीवीर शिखर धवनने रविवारी (8 नोव्हेंबर) झालेल्या आयपीएल2020 च्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. या सामन्यात धवनने अर्धशतकी खेळी करत आपल्या नावावर काही नवे विक्रम नोंदवून घेतले आहेत.
आयपीएल 2020 ‘क्वालिफायर 2’ च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 189 धावा केल्या होत्या. यात सलामीला आलेल्या स्टॉयनिसने 27 चेंडूत 38 व शिखर धवनने 50 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार लगावून 78 धावा केल्या.
त्यानंतर 190 धावांचा पाठलाग करताना हैदराबादने 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. केन विलीयमसन 67 धावा करून परतल्यानंतर हैदराबादचा संघ पुनरागमन करू शकला नाही. रबाडाने 4 व स्टॉयनिसने 3 गडी गारद केले. त्यामुळे दिल्लीने 17 धावांनी सामना जिंकला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
600 पेक्षा अधिक धावा करणारा दिल्लीचा दुसराच फलंदाज
दिल्ली व हैदराबाद मध्ये झालेल्या या सामन्यात शिखर धवनने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 2020 च्या संपूर्ण हंगामात त्याने आत्तापर्यंत 603 धावा केल्या आहेत. या धावांसह तो दिल्लीसाठी एका हंगामात 600 हुन अधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी रिषभ पंतने दिल्लीसाठी 2018 साली 684 धावा केल्या होत्या.
प्लेऑफमधील पहिले अर्धशतक –
आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’ मध्ये धवन याआधीही हैदराबादकडून खेळला होता. परंतु या निर्णायक सामन्यात म्हणजेच प्लेऑफच्या सामन्यात त्याला पहिल्यांदाच अर्धशतक करता आले आहे.
डिविलियर्स टाकले मागे –
त्याचबरोबर रविवारी धवनने आयपीएल कारकिर्दीत ४३ वेळा ५०पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एबी डिविलियर्सला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. डिविलियर्सने ४१ वेळा हा कारनामा केला आहे. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आहे. त्याने सर्वाधिक ५२वेळा हा पराक्रम केला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली असून ४४वेळा एका सामन्यात ५०पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
महिला आयपीएल फायनल : सुपरनोवाज हॅट्रिक साधणार की ट्रेलब्लेझर पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?
…तर रोहित जाणार नाही ऑस्ट्रेलियाला; विराटही ३ कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता
असा झाला दिल्ली कॅपिटल्सचा १३ वर्षांचा आयपीएलमधील प्रवास