आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. यानंतर टी -20 विश्वचषकाचे सामनेही होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्व फ्रँचायझी चांगल्या खेळाडूंना खरेदी करण्याच्या स्पर्धेत गुंतलेले आहेत. ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला टी-20 विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. आता याच एलिससाठी तीन आयपीएल संघ त्याला विकत घेण्याच्या शर्यतीत आहेत. एलिसला फक्त दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात त्याच्या क्रिकेट कौशल्यांबद्दल चर्चा होत आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे सामने यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. कोरोना या जागतिक महामारीमुळे 4 मे रोजी अर्ध्यातूनच ही टी-20 लीग पुढे ढकलण्यात आली होती. यंदाच्या आयपीएलचे 60 पैकी 29 सामने झाले आहेत. राहिलेले 31 सामने अजून खेळायचे बाकी आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मते, तीन आयपीएल संघ नॅथन एलिसला त्यांच्यासोबत जोडून घेण्यास इच्छित आहेत.
सव्वीस वर्षीय वेगवान गोलंदाज नॅथन एलिसने या महिन्यात बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात हॅट्रिक घेऊन खळबळ उडवली होती. त्याने आतापर्यंत फक्त दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 33 सामन्यांमध्ये 38 बळी घेतले आहेत. दरम्यान 34 धावांमध्ये 4 बळी घेतले आहेत ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
मात्र, आयपीएलमध्ये खेळण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसला अद्याप मान्यता मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यानंतरच तो टी-20 लीगमध्ये खेळू शकेल. टी-20 विश्वचषकाचे सामने यूएईमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. अशा परिस्थितीत नॅथन एलिसला आयपीएल खेळण्याचा लाभ मिळू शकतो. पुढील वर्षी आयपीएलच्या लिलावात त्याला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ यांनी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळण्यास सहमती दर्शवली आहे. अशा परिस्थितीत नॅथन एलिस या खेळाडूंसोबत यूएईला जाऊ शकतो. वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडनेही चेन्नईकडून खेळण्याबाबत दुजोरा दिला आहे. तथापि, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, झी रिचर्डसन आणि रिले मेरिडिथ यांच्या आगमनाबाबत शंका आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी राशिद खान झाला भावुक, देशवासियांना दिला ‘असा’ संदेश
किल्लर स्माईलसह जस्सी अन् संजना दिसतायत खूपच गोड; ‘बुमराह कपल्स’चा फोटो बनवेल तुमचाही दिवस
युएईत घोंगावणार मुंबईकरांचे वादळ, अर्जुनसह ‘हे’ खेळाडू हॉटेलच्या रूममध्ये करतायत कसून सराव