टी२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ड्वेन ब्राव्हो आयपीएल २०२२ मध्ये खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी एका मुलाखतीत याची पुष्टी केली आहे. ब्राव्होसोबत, टी२० विश्वचषक स्पर्धेत निवृत्ती जाहीर करणारा पंजाब किंग्सचा खेळाडू ख्रिस गेलच्या खेळण्याबाबत गूढ कायम आहे. चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ म्हणाले की, ड्वेन ब्राव्हो पुढील वर्षीही आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
काशी विश्वनाथन यांनी एका वाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, ”ड्वेन ब्राव्हो आयपीएल २०२२ मध्ये पुनरागमन करेल. त्याने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. तो फिट आहे आणि खेळू शकतो.” मात्र, त्यांनी ब्राव्होला चेन्नई संघात कायम ठेवण्याची पुष्टी केलेली नाही.
विश्वनाथन म्हणाले की, तो पुढील वर्षी चेन्नईचा भाग असेल की नाही हे मी सांगू शकत नाही. ब्राव्हो हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, पण आम्ही नियमानुसार चार खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतो. ३० नोव्हेंबरला कळेल की आम्ही कोणकोणत्या खेळाडूंना कायम ठेवत आहोत.
ब्राव्होने आयपीएलच्या १५१ सामन्यांमध्ये १६७ विकेट घेतल्या आहेत. आयपीएल २०२१ मध्ये त्याने ११ सामन्यात १४ बळी घेत चेन्नईला जेतेपद मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. ब्राव्होची फलंदाजी अप्रतिम आहे आणि तो फक्त २ षटकांत सामन्याचा कल बदलू शकतो. तो एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक फ्रँचायझी त्याला त्यांच्यासोबत ठेवू इच्छिते.
दुसरीकडे, टी२० विश्वचषकादरम्यान निवृत्तीची घोषणा करणाऱ्या ख्रिस गेलने अद्याप पंजाब किंग्स आयपीएलमध्ये खेळण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पंजाब किंग्सच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, गेलने अद्याप परतण्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतु त्यांना खात्री आहे तो परतेल. मात्र, तो पंजाब किंग्ससह राहणार की नाही हे सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.
आयपीएल २०२२ मध्ये खेळाडू कायम ठेवण्याचे काय नियम आहेत?
१. प्रत्येक संघ खेळाडूंच्या खरेदीवर जास्तीत जास्त ९० कोटी खर्च करू शकेल.
२. चार खेळाडूंना कायम ठेवल्यास संघाच्या पर्समधून ४२ कोटी रुपये कापले जातील.
३. तीन खेळाडूंना कायम ठेवल्यास ही रक्कम ३३ कोटी होईल.
दोन खेळाडू कायम ठेवल्याने २४ कोटी कमी होतील.
४. एका खेळाडूला रिटेन केल्याने १४ कोटी रुपये कमी होतील.
५. संघ तीन पेक्षा जास्त भारतीय खेळाडूंना कायम ठेवू शकणार नाहीत. यामध्ये कॅप्ड आणि अनकॅप्ड अशा दोन्ही खेळाडूंचा समावेश असेल.
६. दोन नवीन संघ लिलावातील फक्त तीन खेळाडू निवडू शकतील. यामध्ये दोन भारतीय आणि एक परदेशी खेळाडू असेल.