आयर्लंडचा दिग्गज फलंदाज पॉल स्टर्लिंगनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात स्टर्लिंगनं 27 चेंडूत 25 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्यानं 2 चौकार आणि 1 षटकार मारला. या खेळीदरम्यान या आयरिश फलंदाजानं एक विश्वविक्रम केला.
पॉल स्टर्लिंग हा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 400 चौकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्यानं या बाबतीत पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकलं. बाबरनं टी 20 इंटरनॅशनलमध्ये आतापर्यंत 395 चौकार मारले आहेत. तसं पाहता बाबरकडे पॉल स्टर्लिंगचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
या लिस्टमध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 361 चौकार आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्मानं 359 चौकार, तर पाचव्या स्थानावरील डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 320 चौकार मारण्याचा विक्रम आहे.
पॉल स्टर्लिंगच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, आयर्लंडच्या या दिग्गज फलंदाजानं आतापर्यंत देशासाठी 6 कसोटी, 160 वनडे आणि 135 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 शतकं, कसोटीत 1 शतक आणि टी-20 मध्ये एक शतक आहे. म्हणजेच स्टर्लिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 16 शतकं झळकावली आहेत.
स्टर्लिंगनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 37.75 च्या सरासरीनं 5700 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 87.22 राहिला. 177 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय, त्यानं टी20 आतंरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 27.93 च्या सरासरीनं 3463 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 135.27 एवढा राहिला. 115 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आयर्लंडनं अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 149 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तानचा संघ केवळ 111 धावाच करू शकला. आयर्लंडला हा सामना ३८ धावांनी जिंकण्यात यश आलं.
आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिका यूएईमध्ये खेळली जात आहे. दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानातच होणार, पीसीबीची घोषणा