भारतीय क्रिकेट संघाच्या छोटेखानी आयर्लंड दौऱ्याला शुक्रवारी (18 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तब्बल 11 महिन्यानंतर पुनरागमन करत असलेला बुमराह याला संघाला विजयी करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, असे विधान आयर्लंडचा युवा फिरकीपटू बेन व्हाईट याने केले आहे.
मालिकेच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना व्हाईट म्हणाला,
“आमच्या संघांमध्ये भारताला पराभूत करण्याची क्षमता आहे. आमचा दिवस असेल तेव्हा आम्ही जगातील कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. क्रिकेटमध्ये केव्हा काय होईल हे सांगणे कठीण असते.”
तो पुढे म्हणाला,
“भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध मायदेशात खेळणे नक्कीच आमच्यासाठी मोठी संधी आहे. यातून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. सध्या भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक असून, त्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही सज्जा आहोत.” त्याने याच मुलाखतीत बोलताना आपल्याला संजू सॅमसन याला बाद करायला आवडेल असे देखील म्हटले.
भारतीय संघर्ष नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत पराभूत झाला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला मालिका जिंकण्याचा अपयश आलेले. अशा परिस्थितीत ही मालिका जिंकण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. या संघात प्रामुख्याने सर्व युवा खेळाडूंचा समावेश असून, यातीलच खेळाडू भविष्यात भारतीय संघासाठी खेळणार असल्याचे दिसते. त्याचबरोबर बुमराह याची कर्णधार म्हणून देखील कसोटी लागेल
(Ireland Spinner Ben White Said We Will Defeat Team India In T20 Series)