आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैद्राबादचे प्रदर्शन अतिशय लाजिरवाणे होते. २९ सामन्यांनंतर आयपीएल स्थगित झाले त्यावेळी हैद्राबादाचा संघ पॉईंट्स टेबल मध्ये तळाला होता. यंदाच्या हंगामात त्यांना ७ सामन्यात केवळ एक विजय मिळवता आला होता.
या खराब कामगिरीसाठी हैद्राबादच्या संघ व्यवस्थापनाने डेव्हिड वॉर्नरला जबाबदार धरत त्याला कर्णधार पदावरून दूर केले होते. आता भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने देखील वाॅर्नरलाच संघाच्या अपयशासाठी जबाबदार धरले आहे.
पठाणची वाॅर्नरवर टीका
इरफान पठाणने डेव्हिड वाॅर्नरवर जोरदार टीका केली. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलतांना तो म्हणाला, “हैद्राबादने यावर्षी मला चकित केले. माझ्या दृष्टीने हा संघ अव्वल चार संघांमधील एक संघ होता. हैद्राबादची सगळ्यात मोठी समस्या ही डेव्हिड वॉर्नरचे नेतृत्व होती. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत होता आणि ज्या पद्धतीने नेतृत्व करत होता, त्यामुळे हैद्राबादच्या अडचणींमध्ये वाढ झाली.”
सनरायझर्स हैद्राबादच्या संघ व्यवस्थापनाने ६ सामन्यांनंतर कठोर निर्णय घेत वॉर्नरचे कर्णधारपद काढून घेतले होते. त्यानंतर संघाचे नेतृत्व केन विलियम्सनच्या हाती देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर नेतृत्व काढून घेतल्यावर वॉर्नरला संघात देखील स्थान मिळाले नव्हते. याबाबत बोलतांना इरफान पठाण म्हणाला, “वॉर्नरच्या नेतृत्वावर संघ व्यवस्थापन खुश नव्हते. त्यामुळेच कर्णधारपद केन विलियम्सनकडे देण्याचा निर्णय घेतला गेला असावा.”
हैद्राबादचे निराशाजनक प्रदर्शन
दरम्यान, सनरायझर्स हैद्राबादने या हंगामात आपल्या कामगिरीने चाहत्यांना निराश केले. हंगाम अर्धाच झाला असला तरी पॉईंट्स टेबल मध्ये तळाला असल्याने बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची त्यांची शक्यता जवळपास संपल्यात जमा आहे. ७ सामन्यातील अवघ्या एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला, तर ६ सामने त्यांनी पराभवाचा सामना केला. महत्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीचा देखील त्यांना फटका बसला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ 3 भारतीय खेळाडूंसाठी कसोटी संघाचे दरवाजे झाले कायमचे बंद
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचा सनसनाटी आरोप, म्हणाला भारतीय खेळाडू बायोबबलमध्ये
दिल्ली आणि अहमदाबादमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याचा हट्ट बीसीसीआयला भोवला?