---Advertisement---

अंतिम कसोटी रद्द होण्यासाठी आयपीएलला जबाबदार धरणाऱ्यांना इरफानचे खडेबोल; म्हणाला, ‘माझे दात पडले…’

On: रविवार, सप्टेंबर 12, 2021 8:29 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील मॅंचेस्टरवरील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळण्यात येणारा ५ वा कसोटी सामना रद्द करण्यात आला. ज्यानंतर अनेक ठिकाणाहून याबाबत चर्चांना उधाण आले आहे. काहींनी भारतीय संघावर जोरदार टीका केली, तर काहींनी हा कसोटी सामना रद्द होण्याला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला जबाबदार धरले आहे. यादरम्यान आता भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने आयपीएलला जबाबदार धरणाऱ्या लोकांना चांगलाच धडा शिकवला आहे.

५ व्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे खेळाडूंनी मैदानात उतरण्यास नकार दिला होता. परिणाम स्वरूपी ५ वा कसोटी सामना रद्द करावा लागला, ज्यानंतर टीकाकार चांगलेच जागे झाले. आता इरफान पठाणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

“माझे दात पडले, यासाठी मी आयपीएलला जबाबदार धरू शकतो का?,” असा प्रश्नार्थक टोला पठाणने टीकाकारांना लगावला.

५ व्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघातील सहयोगी फिजियो योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर भारतीय संघात भीतीचे वातावरण तयार झाले होते. प्रत्येक जण या बातमीमुळे चिंतीत होता. मात्र, या दरम्यान भारतीय खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. ज्यामुळे ५ वा कसोटी सामना निर्धारित वेळेत खेळविण्यात येईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र भारतीय संघातील खेळाडूंनी हा सामना खेळण्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे हा कसोटी सामना रद्द करण्यात आला.

चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला होता. तेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर शास्त्रींच्या संपर्कात आलेल्या गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

५ वा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर चाहत्यांनी शास्त्रींना चांगलेच निशाणावर धरले होते आणि शास्त्रींविरोधात कठोर कारवाई करण्याची देखील मागणी करत होते. कारण चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. जिथे बाहेरील लोकांना देखील येण्याची परवानगी देण्यात आली होती. अशात कोरोनासाठी आखून देण्यात आलेल्या कठोर नियमांची शास्त्रींनी पायमल्ली केल्यामुळे चाहत्यांनी त्यांना चांगलेच वेठीस धरले होते.

महत्वाच्या बातम्या –
भारतीय खेळाडूंचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा, दुसऱ्यांदा कोरोना चाचणीचे निकाल निगेटिव्ह, पण…
दक्षिण आफ्रिकेने नाकारले, नामिबियाने स्वीकारले! ‘या’ अफ्रिकन खेळाडूला टी२० विश्वचषकासाठी नामिबियाकडून संधी
रवी शास्त्री-विराट कोहली अडकले वादात! परवानगीविनाच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला लावली होती हजेरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---