---Advertisement---

बाबोव! कॅप्टन रोहितपेक्षाही जास्त पैसे कमावत इशानची वाढली शान, बनला सर्वात महागडा मुंबईकर

Ishan Kishan and Rohit Sharma
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा मेगा लिलाव १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे झाला. या लिलावात बऱ्याच अनपेक्षित बोली पाहायला मिळाल्या. त्यातही भारताचा युवा यष्टीरक्षक इशान किशन याने तर सर्वच रेकॉर्ड मोडले. त्याला विकत घेण्यासाठी त्याची जुनी आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर मुंबईने त्याला विक्रमी १५.२५ कोटींची बोली लावत पुन्हा आपल्या संघात विकत घेतले आहे. यासह इशान मुंबईचा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात इशान किशनसाठी चांगलीच स्पर्धा झाली. १५ कोटींपर्यंत त्याची किंमत गेल्यानंतरही हे दोन्ही संघ माघार घेण्यास तयार नव्हते. मात्र, अखेर मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींच्या बोलीसह त्याला आपल्या ताफ्यात पुन्हा सामील करून घेतले.

इशान गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सचाच भाग होता. मात्र, या लिलावापूर्वी संघाने त्याला मुक्त केले होते. त्यामुळे तो लिलावात सहभागी झाला होता. पण या लिलावातून मुंबईने आपला खेळाडू पुन्हा संघात परत घेतला आहे. विशेष गोष्ट अशी की मुंबईने इतिहासात पहिल्यांदाच लिलावामध्ये एखाद्या खेळाडूसाठी १० कोटींहून अधिक पैसे मोजले आहेत.

यासह इशान आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने विकत घेतलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत त्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मालाही मागे टाकले आहे. मुंबईने २०११ मध्ये रोहितला ९.२ कोटींच्या किंमतीला विकत घेतले होते. यासह तो मुंबई इंडियन्सने लिलावात विकत घेतलेला आजपर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू होता. परंतु आता इशानने त्यालाही मागे टाकले आहे.

आयपीएल लिलावाच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सचे सर्वात महागडे खेळाडू:
इशान किशन – १५.२५ कोटी
रोहित शर्मा – ९.२ कोटी
कृणाल पांड्या – ८.८ कोटी
नाथन कुल्टर-नाईल – ८ कोटी

याखेरीज तो आयपीएलच्या इतिहासात जगातील चौथा आणि भारताचा दुसरा महागडी बोली लागलेला खेळाडू ठरला आहे.

आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू: (Most Expensive Players Of IPL History)
ख्रिस मॉरिस (राजस्थान): १६.२५ कोटी
युवराज सिंग (दिल्ली): १६ कोटी
पॅट कमिन्स (कोलकाता): १५.५० कोटी
इशान किशन (मुंबई): १५.२५ कोटी
काइल जेमिसन (बेंगलोर): १५ कोटी
बेन स्टोक्स (पुणे): १४.५० कोटी

आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडे भारतीय खेळाडू:
युवराज सिंग (दिल्ली)- १६ कोटी
इशान किशन (मुंबई)- १५.२५ कोटी
युवराज सिंग (बेंगलोर)- १४ कोटी
दिनेश कार्तिक (दिल्ली)- १२.५० कोटी
श्रेयस अय्यर (कोलकाता)- १२.२५ कोटी

महत्त्वाच्या बातम्या-

IPL AUCTION: ‘या’ तीन सुंदर चेहऱ्यांची होतेय सर्वत्र चर्चा; जाणून घ्या कोण आहेत

‘सगळे टिव्हीला चिकटून असतील, पण मी फोन स्विच ऑफ ठेवणार’, लिलावावर रोहितची मजेशीर प्रतिक्रिया

वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडणारा ‘कृष्णा’ लिलावात झाला ‘प्रसिद्ध’, १० कोटी देत ‘या’ संघाने घेतले ताफ्यात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---