कोरोनामुळे पाच दिवस उशिरा सुरु झालेली श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील बहुप्रतीक्षित वनडे मालिका रविवारपासून (१८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरु झाली. श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातून भारतीय संघासाठी मुंबईचा सूर्यकुमार यादव व झारखंडचा युवा यष्टीरक्षक इशान किशन यांना वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली. इशान किशनने वनडे कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे.
पहिल्याच चेंडूवर षटकार
या वनडे मालिकेत इशान किशनला संधी मिळणार का नाही याबाबत साशंकता होती. मात्र, सामन्याआधी संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाल्याने इशान किशनला वनडे पदार्पणाची संधी मिळाली. तो भारताचा २३५ वा वनडे क्रिकेटपटू बनला. तसेच, वनडे क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा तो झारखंडचा पाचवा क्रिकेटपटू ठरला.
https://twitter.com/SonySportsIndia/status/1416769268226527240
इशानने या संधीचे सोने करताना तुफानी अर्धशतक साजरे केले. त्याने पहिल्याच चेंडूवर पुढे सरसावत खणखणीत षटकार मारून वनडे कारकीर्दीला सुरुवात केली. यापूर्वी, वनडे कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा ही किमया केवळ चार खेळाडूंना करता आली होती. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान लू याने २००८ मध्ये, पाकिस्तानच्या जवाद दाऊदने २०१० मध्ये, स्कॉटलंडच्या क्रेग वॉलसने २०१६ तर, झिम्बाब्वेच्या रिचर्ड नगवाराने २०१७ मध्ये ही किमया केलेली. त्यानंतर आता अशी कामगिरी करणारा इशान पाचवा फलंदाज बनला.
पहिल्याच सामन्यात इशानचे अर्धशतक
श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या इशान किशनने केवळ ४२ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५९ धावा ठोकल्या. इशानने मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध टी२० पदार्पण करतानाही अर्धशतक साजरे केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
शिखरचा ‘गब्बर’ विक्रम! गांगुलीसह विव रिचर्ड्ससारख्या दिग्गजांनाही टाकले मागे
कृणाल पंड्याने मारली असलंकाला मिठी, दिले खिलाडूवृत्तीचे दर्शन, व्हिडिओ झाला व्हायरल
कृणाल पंड्याने मारली असलंकाला मिठी, दिले खिलाडूवृत्तीचे दर्शन, व्हिडिओ झाला व्हायरल






