आयपीएलचा 17 वा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत खूपच खराब राहिला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघानं स्पर्धेत खेळलेले तीनही सामने गमावले आहेत. मात्र सातत्यानं खराब कामगिरी करूनही मुंबईचे खेळाडू मजा करणं काही थांबवत नाहीत. याची प्रचिती पुन्हा एकदा आली.
मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन विमानतळावर सुपरमॅनचे कपडे घालून दिसला, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ईशान किशननं सुपरमॅनसारखे कपडे घातले आहेत, ज्यावर मुंबई इंडियन्सचा लोगोही आहे. फोटो विमानतळाचा असल्याचं कळतं, कारण फोटोमध्ये ईशान आपलं सामान घेऊन कुठेतरी जाताना दिसतोय.
आता तुम्ही विचार करत असाल की, ईशान किशननं असा पोशाख का घातला? आणि त्यावर मुंबई इंडियन्सचा लोगो कसा काय आहे? तर याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो. वास्तविक, ईशान किशनला मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटनं शिक्षा केली आहे. मुंबईची मॅनेजमेंट आपल्या खेळाडूंना, सरावाला उशीरा येणं, हॉटेलमध्ये फोन वर बोलण्याच्या मर्यादेचं पालन न करणं, इत्यादी नियम मोडल्यास शिक्षा देते. संघाकडे एक विशेष पोशाख असतो, जो त्या हंगामासाठी डिजाईन केलेला असतो. एखादा खेळाडू जर टीम मॅनेजमेंट द्वारा निर्धारित कोणताही नियम मोडतो, तर त्याला दिवसभर हा पोशाख घालावा लागतो. ईशान किशनला याआधीही अशाप्रकारची शिक्षा झालेली आहे. विशेष म्हणजे, या नियमांतून संघातील वरिष्ठ खेळाडूंनाही सूट नसते.
Ishan Kishan in Superman outfit 😀🔥 [Manav Manglani Instagram] pic.twitter.com/HOjBzfddhR
— Johns. (@CricCrazyJohns) April 2, 2024
मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला निर्धारित 20 षटकांत 9 विकेट गमावून केवळ 125 धावा करता आल्या. राजस्थानासाठी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं 22 धावांत 3 बळी घेतले. तर लेगस्पिनर युजवेंद्र चहलनं 11 धावांत 3 जणांना तंबूत पाठवलं.
प्रत्युत्तरात, धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं 15.3 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठलं. यात रियान परागच्या अर्धशतकाचाही समावेश आहे. राजस्थाननं हा सामना सहा गडी राखून सहज जिंकला. या विजयासह राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 च्या वेळापत्रकात अचानक बदल, काही सामन्यांच्या तारखा बदलल्या
शाळेतील शिक्षिकेवरच फिदा झाला होता ट्रेंट बोल्ट! कशी सुरू झाली प्रेमकहाणी? जाणून घ्या
मोठी बातमी! अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची 2024 टी20 विश्वचषकातून माघार