भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्यासाठीही भारतीय संघाची लवकरच घोषणा होऊ शकते. कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी काही खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. वर्कलोड मॅनेजमेंटसाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य भाग असलेल्या शुबमन गिलला मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहसह टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते. कारण भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका 1 ऑक्टोबरला संपेल. त्यानंतर लगेचच 6 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू होईल. 12 ऑक्टोबरला ही टी20 मालिका संपल्यानंतर 4 दिवसांनीच (16 ऑक्टोबरपासून) न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात होईल. अशा परिस्थितीत स्टार खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटला लक्षात घेऊन बीसीसीआय हा निर्णय घेऊ शकते.
इशान किशनला संधी मिळू शकते
याशिवाय यष्टीरक्षक रिषभ पंतलाही विश्रांती दिली जाऊ शकते, कारण कसोटी सामन्यांसाठी त्याची उपलब्धता हे बोर्डासाठी पहिले प्राधान्य असेल. बांगलादेश, न्यूझीलंडव्यतिरिक्त भारताला पुढील वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जून 2025 मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामनाही खेळायचा असेल. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटसाठी इशान किशनला संघात परत बोलावले जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय केंद्रीय करार गमावल्यापासून इशान भारतीय संघाबाहेर आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या टी20 क्रिकेटमधील निवृत्तीनंतर रुतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासारख्या खेळाडूंना संधी मिळू शकते. त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि अक्षर पटेल यांनाही विश्रांती दिली जाते की नाही?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे, कारण ते बांगलादेश कसोटीतही सहभागी होणार आहेत.
हेही वाचा –
“धोनी नॉनव्हेज खायचा, पण माझ्यासाठी त्याने महिनाभर शाकाहारी जेवण खाल्ले”, जुन्या रूममेटचा खुलासा
मुंबई इंडियन्सच्या फास्ट बॉलरची दुलीप ट्रॉफीत हवा! अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा गोलंदाज
VIDEO : युवा फलंदाजाचं दुर्दैव…असा विचित्र रनआऊट यापूर्वी कधीच पाहिला नसेल