विशाखापट्टणम। शुक्रवारी(10 मे) आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात क्वाॅलिफायर 2 चा सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्यांचे आयपीएल 2019 मधील आव्हानही संपुष्टात आले. तर चेन्नईने अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 147 धावा केल्या होत्या. यामध्ये दिल्लीकडून 11 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या इशांत शर्माने शेवटच्या तीन चेंडूत 10 धावा जोडल्या. यात त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. हा षटकार त्याने रविंद्र जडेजा टाकत असलेल्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सरळ दिशेने मारला.
विशेष म्हणजे इशांतने 2009 नंतर पहिल्यांदा ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये षटकार मारला आहे. तसेच हा त्याचा ट्वेंटी20 क्रिकेटमधील केवळ दुसरा षटकार होता. त्याने आत्तापर्यंत 133 टी20 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर इशांतने त्याच्या कारकिर्दीत मारलेला हा एकूण सहावाच षटकार ठरला आहे.
त्याने त्याच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 132 सामन्यात 3 षटकार मारले आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 123 सामन्यात 1 षटकार मारला आहे.
याचबरोबर इशांतने केलेल्या 10 धावा या त्याच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावा देखील ठरल्या आहेत. तसेच इशांतने या सामन्यात गोलंदाजी करताना चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीची विकेटही घेतली. पण तोपर्यंत दिल्लीच्या हातातून विजय जवळ जवळ निसटला होता.
इशांतसाठी हा आयपीएलचा मोसम चांगला ठरला आहे. त्याने या मोसमात 13 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 89 सामन्यात 72 विकेट्स घेतल्या आहेत.
चेन्नईने शुक्रवारी झालेल्या या सामन्यात फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनने केलल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 19 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात 148 धावांचे आव्हान सहज पार केले.
6 4 = Ishant's late blitz https://t.co/4bmlBbrpRS via @ipl
— gujjubhai (@gujjubhai17) May 10, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आत्तापर्यंत या संघांनी खेळले आहेत आयपीएलचे अंतिम सामने
–आयपीएलमध्ये हरभजन सिंगचा मोठा पराक्रम, या खास यादीत झाला समावेश
–चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली विरुद्धच्या विजयाबरोबरच केला हा खास कारनामा