---Advertisement---

मोहम्मद शमीपाठोपाठ या खेळाडूनेही बुमराहच्या टीकाकारांना सुनावले खडेबोल!

---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मागील काही सामन्यांतील खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र बुमराहला भारतीय संघातील खेळाडूंकडून पाठिंबा मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) बुमराहला पाठिंबा दिला होता. आता त्याच्यापाठोपाठ इशांत शर्मानेही (Ishant Sharma)  बुमराहला पाठिंबा दिला आहे.

वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (1st Match of 2 Matches Test Series) सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा(22 फेब्रुवारी) खेळ संपल्यानंतर इशांतने बुमराहला पाठिंबा देत आपले मत व्यक्त केले आहे.

बुमराहला पाठिंबा देत इशांत म्हणाला की, मला हसायला येत आहे. कारण मागील 2 वर्षांची बुमराहची कामगिरी न पाहता काही लोक बुमराहच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

‘आश्चर्याची बाब म्हणजे एका डावानंतर लोकांचे मत लगेच बदलते’, असे बुमराहबद्दल बोलताना इशांत म्हणाला. ‘मागील दोन वर्षात आम्ही नेहमी 20 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये मी, बुमराह, शमी, जडेजा आणि अश्विनचा समावेश आहे,’ असेही इशांत पुढे म्हणाला.

‘एका कसोटी सामन्याच्या आधारे लोक लगेच प्रश्न कसे काय विचारू शकतात?, बुमराहच्या क्षमतेवर कोणीलाही संशय असेल, असे मला तरी वाटत नाही. कारण आपल्या पदार्पणापासूनच बुमराहने आपल्या देशासाठी जे काही केले आहे, त्यावरून कोणीही बुमराहवर प्रश्न उपस्थित करेल असे मला वाटत नाही,’ असे बुमराहचे समर्थन करताना इशांत म्हणाला.

यापूर्वी शमीने बुमराहचे समर्थन करत त्याला पाठिंबा दिला होता. यावेळी त्याने बुमराहच्या टीकाकारांना चांगलेच फटकारले होते. शमीने बुमराहच्या टीकाकारांना विचारले होते की, काही वनडे सामन्यांत खराब कामगिरी केल्यामुळे तुम्ही हे कसे काय विसरू शकता की, बुमराहने आपल्या देशाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.

वेलिंग्टनला सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इशांतने 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर आर अश्विनने 3 विकेट्स तसेच बुमराह आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांवर संपुष्टात आला. पण त्यापूर्वी भारताला पहिल्या डावात 165 धावाच करता आल्याने न्यूझीलंडने 183 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

त्यानंतर आता तिसऱ्या दिवसाखेर आज भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 144 धावा केल्या असून अजून भारत 39 धावांची पिछाडीवर आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---