---Advertisement---

वाह रे पठ्ठ्या! जोस बटलरची विकेट घेताच ईशांत शर्माचा कुंबळे, कपिल देव यांच्या पंक्तीत समावेश

On: रविवार, ऑगस्ट 15, 2021 1:52 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारताचा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली होती. मात्र, इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या शतकीय खेळीमुळे इंग्लंडने सामन्यात जोरदार पुनरागमन केले.

दरम्यान, दुसरा कसोटी सामन्यापूर्वी शार्दुल ठाकूर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे ईशांत शर्माला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. त्याने या सामन्यात चांगली गोलंदाजी करताना भारताकडून पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या. या तीन विकेट्समध्ये जोस बटलर, मोईन अली आणि सॅम करन यांच्या विकेट्सचा समावेश होता.

यावेळी ईशांतने जोस बटलरची विकेट घेत एक विक्रम त्याच्या नावे नोंदवला. ईशांत शर्माने विदेशी जमिनीवर आतापर्यंत २०० विकेट्स घेतल्या आहेत. याआधी भारताकडून असा पराक्रम केवळ तीनच गोलंदाजांनी केला आहे. बटलर ईशांतची विदेशात घेतलेली २०० वी विकेट ठरला.

ईशांत शर्माने आतापर्यंत एकूण १०३ सामने खेळले आहेत. ज्यात ३२.०९ च्या सरासरीने एकूण ३०९ विकेट्स काढल्या आहेत. ज्यामध्ये त्याने एकूण ११ वेळा एका डावात ५ विकेट्स, तर एकदा सामन्यात १० विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

त्याचबरोबर त्याने विदेशात ६१ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात १०७ डावात त्याने ३२.७३ च्या सरासरीने २०२ विकेट्स घेतल्या आहेत. ईशांतने विदेशात ९ वेळा एका डावात ५ विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. तर एकदा सामन्यात १० विकेट घेण्याचा देखील कारनामा त्याने केला आहे. ७४ धावांवर ७ विकेट्स हे त्याचे गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी होती.

विदेशी जमिनीवर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर फिरकीपटू गोलंदाज अनिल कुंबळे आहेत. कुंबळे यांनी विदेशात ६९ सामन्यांमध्ये ३५.८५ च्या सरासरीने एकूण २६९ विकेट घेतल्या आहेत. एका डावात ५ विकेट घेण्याचा कारनामा त्यांनी १० वेळा केला आहे.

यानंतर भारताला सर्वप्रथम विश्‍वचषक स्पर्धा जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी विदेशात ६६ सामन्यात २१५ विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जहीर खान असून त्याने ५४ कसोटी सामन्यात २०७ विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३६४ धावा केल्या होत्या. याच्या उत्तरादाखल इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर सर्वबाद ३९१ धावा केल्या, ज्यात कर्णधार जो रूटने नाबाद १८० धावांची खेळी केली. तसेच भारताच्या मोहम्मद सिराजला ४ विकेट मिळाल्या, तर ईशांत शर्माला ३ विकेट्स आणि मोहम्मद शमीला १ विकेट मिळाली.

महत्वाच्या बातम्या –
‘स्वत:च्या खेळाकडे आधी लक्ष दे’, विराटबद्दल ‘ते’ ट्वीट करताच रियान परागला चाहत्यांनी सुनावले
Video: बीसीसीआयचा लोगो दाखवत लाॅर्ड्स मैदानावर अज्ञात चाहत्याचा गोंधळ, खेळाडूंचे विनापैशाचे मनोरंजन
आजपर्यंत इंग्लंडच्या कोणत्याच कर्णधाराने केला नव्हता तो ‘मोठा’ पराक्रम रुटने करुन दाखवलाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---