दिल्ली: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी दिल्ली डायनॅमोज आणि जमशेदपूर एफसी यांच्यात 2-2 अशी बरोबरी झाली. नेहरू स्टेडियमवरील लढतीत तीन गोल दुसऱ्या सत्रात झाले.
जमशेदपूरने सात सामन्यांत पाचवी बरोबरी साधली. त्यांनी दोन विजय मिळविले आहेत. त्यांची अपराजित मालिका कायम राहिली. 11 गुणांसह त्यांनी आघाडीवरील नॉर्थइस्ट युनायटेड इतकेच गुण मिळविले. सरस गोलफरकामुळे जमशेदपूरचे दुसरे स्थान आहे. नॉर्थइस्टचा गोलफरक (10-6, 4), तर जमशेदपूरचा (14-9, 5) असा आहे.
दिल्लीची विजयाची प्रतिक्षा कायम राहिली. दिल्लीने सात सामन्यांत चौथी बरोबरी साधली. त्यांचे तीन पराभव झाले आहेत. चार गुणांसह त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.
पुर्वार्धातील गोलमुळे जमशेदपूरकडे एका गोलची आघाडी होती. सर्जिओ सिदोंचा याने हा गोल केला. मध्यंतरास जमशेदपूरने ही आघाडी राखली. त्यानंतर दिल्लीने दुसऱ्या सत्रात दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. लालियनझुला छांगटे आणि अॅड्रीया कॅर्मोना यांनी हा धडाका साधला. त्यामुळे दिल्लीकडे एका गोलची आघाडी जमली होती, पण टिरीने जमशेदपूरला बरोबरी साधून दिली.
सकारात्मक चालींमुळे खाते उघडण्याची शर्यत जमशेदपूरने जिंकली. जोरदार प्रतिआक्रमणाच्या जोरावर गौरव मुखीने सिदोंचा याला पास दिला. सिदोंचाने मारलेला चेंडू दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याच्या हाताला लागून नेटमध्ये गेला.
पहिला प्रयत्न अपेक्षेप्रमाणे जमशेदपूर एफसीने केला. गौरव मुखीने पाब्लो मॉर्गाडोला उजवीकडून पा दिला. पाब्लोने चेंडू बॉक्समध्ये नेत फटका मारला, पण तो प्रतिस्पर्धी बचावपटूला लागला. सहाव्या मिनिटाला नारायण दासने दिलेल्या पासवर डावीकडून रेने मिहेलीच याला संधी मिळाली. त्याने क्रॉस पास देण्यासाठी डॅनिएल लाल्हीलीम्पुईया याच्या दिशेने चेंडू मारला, पण त्याचा हेडर स्वैर होता. सातव्या मिनिटाला सिदोंचाने कॉर्नरवर शॉट मारला. बॉक्समध्ये आलेल्या चेंडूवर टिरीचे हेडिंग मात्र चुकले.
दहाव्या मिनिटाला मिहेलीच आणि लालियनझुला छांगटे यांनी चाल रचली. छांगटेने परत दिलेला चेंडू मिहेलीच छातीवर नियंत्रीत करून मारणार तोच त्याला पाडण्यात आले, दिल्लीचे पेनल्टीचे अपील पंचांनी फेटाळून लावले. 16व्या मिनिटाला मुखीला उजवीकडून मोकळीक मिळाली. त्याने मेमोला पास दिला, पण चाल पूर्णत्वास नेण्यासाठी त्याला योग्य ठिकाणी सहकारी मिळू शकले नाहीत. 19व्या मिनिटाला सिदोंचाने घेतलेल्या फ्री किकवर प्रतिक चौधरीने हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती.
25व्या मिनिटाला सिदोंचाने पुन्हा मुसंडी मारली. मेमोने हेडिंग करीत त्याला साथ दिली आणि चेंडू मायकेल सुसैराज याच्या दिशेने सोपविला, पण मायकेलचा फटका स्वैर होता. उत्तरार्धातही जोरदार चुरस झाली.