---Advertisement---

आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीला पराभवाचा धक्का देत बेंगळुरूने राखल्या बाद फेरीच्या आशा कायम

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 12:20 AM
---Advertisement---

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात बेंगळुरू एफसीने सोमवारी मुंबई सिटी एफसीला 4-2 असा पराभवाचा धक्का दिला. क्लबसाठी कारकिर्दीतील दोनशेवा सामना खेळणारा कर्णधार सुनील छेत्री याच्यासह ब्राझीलच्या क्लेईटन सिल्वा याने प्रत्येकी दोन गोल केले. मुंबई सिटीचा बाद फेरीतील प्रवेश यापूर्वीच नक्की झाला असला तरी बेंगळुरूने आशा कायम राखल्या.

बांबोली येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. बेंगळुरूचे खाते पहिल्याच मिनिटाला मध्य फळीतील ब्राझीलचा 34 वर्षीय खेळाडू क्लेईटन सिल्वा याने उघडले. दुसरा गोल त्यानेच 22व्या मिनिटाला केला. मध्यंतरास बेंगळुरूकडे 2-0 अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात मुंबई सिटीकडून आघाडी फळीतील इंग्लंडच्या 34 वर्षीय ऍडम ली फाँड्रे याने दोन गोल केले, पण त्याच्या अलिकडे-पलिकडे छेत्रीने भर घातली. त्यामुळे बेंगळुरूचा विजय नक्की झाला.

बेंगळुरूने 18 सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून सात बरोबरी व सहा पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 22 गुण झाले. जमशेदपूर एफसीला (18 सामन्यांतून 21) मागे टाकून त्यांनी सहावे स्थान गाठले. हैदराबाद व एफसी गोवा यांची 17 सामन्यांतून 24 गुण अशी समान कामगिरी आहे. दोन्ही संघांचा एक सामना बाकी आहे. बेंगळुरू त्यांच्यापेक्षा दोन गुणांनी मागे आहे.

मुंबई सिटीला 17 सामन्यांत तिसराच पराभव पत्करावा लागला. दहा विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 34 गुण व दुसरे स्थान कायम राहिले.

बेंगळुरूने पहिल्याच मिनिटाला खाते उघडले. बचावपटू अजित कुमार याचा बॅकपास रोखण्याचा मुंबईचा मध्यरक्षक रेनीयर फर्नांडीस याचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे सुनील छेत्रीला संधी मिळाली. छेत्रीने उजवीकडे आघाडी फळीतील सहकारी उदांता सिंगला पास दिला. पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवित उदांताने निर्माण केलेल्या संधीचे सिल्वाने गोलमध्ये रुपांतर केले.

सामन्याच्या 22व्या मिनिटाला बेंगळुरूचा स्ट्रायकर सिस्को हर्नांडेझ याने उजवीकडे मिळालेली फ्री किक घेतली. त्याने ताकद लावून फटका मारला होता. त्यामुळे सिल्वाने नाजूक पण अचूकपणे चेंडूला नेटची दिशा दिली.

मुंबई सिटीने दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी बरोबरी साधली. मध्य फळीतील सी गोडार्ड याने उजवीकडून घोडदौड केली. त्याच्या क्रॉस पासला नेटची दिशा देताना ऍडमने प्रतिस्पर्धी मध्यरक्षक हरमनज्योत खाब्रा याच्या प्रतिकाराला दाद लागू दिली नाही. त्याने अचूक फटका मारत बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला चकविले.

सामन्याच्या 57व्या मिनिटाला छेत्रीने गोल केला. गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने गोलकीक घेताना लांबवर फटका मारला. त्यावेळी मुंबई सिटीचा मध्यरक्षक अहमद जाहु चेंडू रोखण्यासाठी प्रयत्नशील होता, पण तोल जाऊन तो पडला. छेत्रीने यामुळे लक्ष विचलित होऊ दिले नाही. त्याला रोखण्यासाठी मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग पुढे सरसावला, पण छेत्रीने अफलातून कौशल्य दाखवित त्याच्या पायांमधून चेंडू नेटमध्ये मारला.

मुंबई सिटीचा दुसरा गोल गोडार्डच्याच चालीवर ऍडमने केला. त्याने हेडिंगवर लक्ष्य साधले. भरपाई वेळेत छेत्रीने बदली स्ट्रायकर एडमंड लालरीन्दीका याच्या पासवर गोल केला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयएसएल २०२०-२१ : जमशेदपूरला हरवून एटीके मोहन बागानची आघाडी

आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून नॉर्थईस्ट तिसऱ्या स्थानी

आयएसएल २०२०-२१ : सुपर सब इशानमुळे गोव्याने चेन्नईयीनला रोखले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---