गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी (26 डिसेंबर) वास्को येथील टिळक मैदानावर चेन्नईयन एफसीला हरवून पहिला विजय नोंदवण्याचा एससी ईस्ट बंगाल संघाचा निर्धार आहे.
सहा सामने होऊनही ईस्ट बंगालला एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यांनी केलेले तीन गोल सहभागी संघांमध्ये सर्वांत कमी आहेत, तर पत्करावे लागलेले 11 गोल दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. त्यांचे दोन्ही गोल हैदराबाद एफसीविरुद्ध जॅक्स मॅघोमा याने केले.
यानंतरही या आकड्यांच्या पलिकडे त्यांच्या कामगिरीविषयी भाष्य करण्यासारखे काही मुद्दे आहेत. गेल्या दोन सामन्यांत त्यांच्या खेळात सुधारणा झाल्याचे दिसून आले. हैदराबादविरुद्ध एकही गुण न मिळणे त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरले. मागील सामन्यात बहुतांश वेळ केरला ब्लास्टर्सवर वर्चस्व राखूनही त्यांना विजय मिळाला नाही.
ब्लास्टर्सविरुद्ध त्यांना बरोबरी साधावी लागली. अखेरच्या क्षणी त्यांना गोल पत्करावा लागला. आता ही निराशा झटकून टाकल्याचे प्रशिक्षक रॉबी फाऊलर यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही येथे ज्या मनोधैर्याने दाखल झालो आहोत ते चांगले आहे. काही वेळा आम्ही दुर्दैवी ठरलो. अखेरच्या क्षणी तुम्हाला गोल पत्करावे लागणे दुर्दैवी असते, पण खेळाडूंनी चांगला खेळ केला आणि गोलच्या बऱ्याच संधी निर्माण केल्या. आम्ही सामना अगदी सफाईदारपणे जिंकू शकलो असतो, पण शेवटी फुटबॉलचा खेळ असाच असतो.
फाऊलर यांनी पुढे सांगितले की, खेळाडूंकडे प्रेरणेची कमतरता नाही. कामगिरीतील सुधारणेमुळे अपेक्षित निकाल साध्य होतील. कोणत्याही खेळाडूला प्रेरीत करणे अवघड नसेल. हा खेळ खेळणे ही आम्हा सर्वांची आवडती गोष्ट आहे. आम्ही हा खेळ खेळतो, कारण आम्हाला तो आवडतो. यामुळे प्रेरणा नक्कीच आहे. आम्ही अपेक्षित निकालापासून फार लांब अंतरावर नाही. आम्ही कामगिरीला लवकरच कलाटणी देऊ. हे अगदी लवकरच घडेल अशी आशा आहे. आम्ही जे काही करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि जी कामगिरी साध्य करण्याचा उद्देश ठेवला आहे. त्यात प्रत्येक सदस्याच 120 टक्के माझ्या पाठिशी आहे.
चेन्नईयनचा संघही प्रतिकूल स्थितीत आहे. ईस्ट बंगालप्रमाणे काही समस्यांना त्यांनाही भेडसावत आहेत. त्यांना आतापर्यंत पाचच गोल करता आले आहेत. त्यांच्यापेक्षा कमी गोल केवळ हा प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालचे आहेत. त्यांचे दोनच गोल खुल्या खेळातून झाले आहेत.
त्यांचा संघ मात्र एफसी गोवावरील मनोधैर्य उंचावणाऱ्या विजयासह येथे दाखल झाला आहे. स्पर्धेतील मोहिम पुढे कशी सरकते हे पुढील काही सामन्यांवरून स्पष्ट होईल याची प्रशिक्षक क्साबा लॅसझ्लो यांना कल्पना आहे. त्यांनी सांगितले की, तुम्ही संभाव्य विजेते असला तरी बरेच दडपण असते. तुम्ही दोन सामने जिंकले तर गुणतक्त्याच्या अग्रभागी जाता आणि दोन सामने पराभूत झालात, तर खाली घसरता. हा सामना आमच्यासाठी अवघड असेल. ईस्ट बंगालचा संघ नवा आहे, पण त्यांनी परिस्थितीशी चांगले जुळवून घेतले आहे. आम्हाला चांगली एकाग्रता साधावी लागेल आणि खेळावरील लक्ष कायम ठेवावे लागेल.