गोवा (दिनांक ६ फेब्रुवारी) – गतविजेत्या मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) अखेर सात सामन्यानंतर पहिल्या विजयाची चव चाखली. सातत्याने प्रयत्न करूनही त्यांना चेन्नईयन एफसीची बचावफळी भेदता येत नव्हती. त्यामुळे खेळाडू काहीसे निराश झाले होते, परंतु सामना संपायला ५ मिनिटांचा खेळ शिल्लक असताना मुंबई सिटीच्या ताफ्यात आनंदाचे वातावरण परतले. विक्रम प्रताप सिंगने ८५ व्या मिनिटाला गोल करून मुंबई सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ९०+४व्या मिनिटाला लुकाज गिकिएविचने चेन्नईयनला बरोबरी मिळवून देण्याची सोपी संधी गमावली. या निकालासोबत मुंबई सिटीने २२ गुणांसह पाचव्या स्थानावर कूच केली आहे.
गुणतालिकेत अव्वल चारमध्ये परतण्यासाठी गतविजेता मुंबई सिटी एफसी ( ६ व्या स्थानी) आणि चेन्नईयन एफसी ( ७ व्या स्थानी) यांच्यात पहिल्या हाफमध्ये कमालीचा चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. लालिंझुआला छांग्टे, कॅसिओ गॅब्रिएल, बिपिन सिंग यांनी सातत्याने आक्रमण करताना चेन्नईयनच्या बचावपटूंची कसोटी पाहिली. पण, त्यावर ते खरे उतरले. चेन्नईयनने त्यांची बचावफळी मजबूत राखताना मुंबई सिटीला गोलपोस्टपर्यंत पोहोचूनही यश मिळू देत नव्हते. चेंडूवर अधिक काळ ताबा, अधिक कॉर्नर आणि अधिक शॉट ऑन टार्गेट असूनही मुंबई सिटीला गोल करता आला नाही. इगॉर अँग्युलोने गोल करण्याचे काही सुरेख प्रयत्न केले, परंतु त्याला गोल करता आला नाही. चेन्नईयनचा गोलरक्षक देबजित मजुमदार यानेही उत्तम बचाव केला. त्याने मुंबई सिटीचे तीन ऑन टार्गेट प्रयत्न रोखले. त्यामुळे पहिला हाफ गोलशून्य बरोबरीचा राहिला.
दुसऱ्या हाफमध्येही मुंबई सिटीचे आक्रमण सुरूच राहिले आणि ४८व्या मिनिटाला अँग्युलो चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात घुसला होता, पण अम्पायरने ऑफ साईट दिला. या निर्णयावर मुंबई सिटीच्या खेळाडूने तीव्र नाराजी व्यक्त केली. चेन्नईयनचे खेळाडू सावध पवित्र्यात दिसले. लालेंगमावियाने ५१व्या मिनिटाला दुरूनच गोल करण्याचा प्रयत्न केला. मुंबई सिटीचे आक्रमणपटू दडपण वाढवताना दिसत होते. ५७ व्या मिनिटाला छांग्टेला वन ऑन वन संधी मिळाली होती, परंतु चेन्नईयनच्या गोलरक्षकाने चेंडूवर ताबा मिळवला. ६०व्या मिनिटाला अँग्युलो फ्री किकवर आलेल्या पासवर गोल करण्यापासून पुन्हा चुकला. ६२व्या मिनिटाला छांग्टे चेंडू घेऊन चेन्नईयनच्या पेनल्टी क्षेत्रात घुसला होता अन् अँग्युलोला चेंडूला केवळ दिशा द्यायची होती. पण, ६ यार्डाच्या बॉक्समध्ये चेन्नईयनच्या बचावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
६२व्या मिनिटाला बिपिन सिंगने सोपी संधी गमावली आणि मुंबई सिटीच्या खेळाडूंनी डोक्यावर हात मारला. गोल करण्यात सातत्याने अपयश येत असल्यामुळे मुंबईचे खेळाडू निराश झालेले दिसले. तेच दुसरीकडे चेन्नईयन सावध खेळ करून संधीची वाट पाहत होते. ७१व्या मिनिटाला नेरियस व्हॅलस्किस याच्याकडून चेन्नईयनसाठी गोल करण्याचा पहिला प्रयत्न झाला, परंतु तो ऑफ टार्गेट राहिला. ७६व्या मिनिटाला चेन्नईयनला आयती संधी मिळाली होती, परंतु त्यांनी अखेरच्या क्षणाला रणनीती बदलली आणि त्यांचा डाव फसला. यामुळे प्रशिक्षकही नाराज दिसले. सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मुंबई सिटीला ८५व्या मिनिटाला अखेर यश आले. चेन्नईयनच्या बचावफळीतील त्रुटी हेरून ब्रॅडेन इन्मॅनने सुरेख पास दिला आणि त्यावर विक्रम सिंगने कोणतीही चूक न करता गोल केला. अखेरच्या क्षणाला चेन्नईयनने बरोबरीची संधी गमावली आणि मुंबईने बाजी मारली.
निकाल – मुंबई सिटी एफसी १ ( विक्रम सिंग ८५ मि. ) विजयी विरुद्ध चेन्नईयन एफसी ०.