२०१७-१८ सालचा ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर धूळ चारत कसोटी मालिकाविजय प्राप्त केला. नुकतेच भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दुसऱ्या कुठल्याही कर्णधाराला या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड असल्याचे मत व्यक्त केले.
कोहलीने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या मालिकेत देखील पराभूत केले. तसेच ऑस्ट्रेलियन मातीवर देखील मात दिली. ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या या मालिका विजयाच्या वेळी रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. भारतने तब्बल ७१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात पराभूत केले होते.
माध्यमातील वृत्तानुसार शास्त्री यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मागील ७१ वर्षांत खेळल्या गेलेल्या मालिकांचा लेखाजोखा मांडणारे पुस्तक प्रदर्शित केले. त्यावेळी बोलताना शास्त्री यांनी या विजयाचे महत्व विशद केले. ते म्हणाले, “७१ वर्षे वाट पाहिल्यानंतर मिळालेल्या विजयाची गोडी काही औरच होती. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात आणि त्यांच्या देशात, अशा दोन्ही ठिकाणी कसोटी मालिका विजय मिळविले आहेत. ही नक्कीच खूप उल्लेखनीय कामगिरी आहे. दुसऱ्या कोणत्याही कर्णधाराला या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड असेल.”
ऑस्ट्रेलियातील विजयाचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले, “ऑस्ट्रेलियातील विजयाचे महत्व यासाठी अधिक आहे की खडतर परिश्रमाशिवाय हा विजय मिळणे अशक्य असते. आणि एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्यावेळी तुम्ही हे परिश्रम करून हा विजय मिळविता, त्यावेळी तुम्ही सन्मानाचे खरे हकदार असतात.” भारताच्या प्रदर्शनाचे कौतुक करताना त्यांनी भारतीय संघाने २१व्या शतकात ऑस्ट्रेलियन भूमीवर दमदार खेळाचे प्रदर्शन केले आहे, अशी पुस्तीही जोडली.
भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंका असून भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळविला आहे. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत असून तिसऱ्या सामन्याला आज (७ जानेवारी)पासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात झाली आहे.
संबधित बातम्या:
IND vs AUS : पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; पुकोवस्की-लॅब्यूशानेची अर्धशतकी खेळी
AUS v IND : पुरुषांच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच महिलेने केले अंपायरींग, सिडनीत रचला इतिहास
दहा मिनिटात दोन झेल सोडल्याने रिषभ पंतवर चाहत्यांची आगपाखड, मीम्स व्हायरल