नॉटिंघम येथे सुरू असलेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याच्याकडे एक ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे. भारताचा केवळ एक गडी बाद करून तो जगातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनेल.
अँडरसनने मिळवले दोन बळी
नॉटिंघम कसोटी सामन्यात पहिल्या दिवशीची चार षटके व दुसऱ्या दिवशीचा अँडरसनचा पहिला स्पेल त्याच्या लौकिकानुसार नव्हता. मात्र, लंचनंतर तो आपल्या जुन्या लयीमध्ये दिसून आला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला त्याने भारताचा प्रमुख कसोटीपटू चेतेश्वर पुजारा व कर्णधार विराट कोहली यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत इंग्लंडला जबरदस्त पुनरागमन करून दिले.
कुंबळेची केली बरोबरी
पुजारा व कोहली यांना बाद करताच अँडरसनच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ बळींची नोंद झाली. भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यानेदेखील १३२ सामन्यात ही कामगिरी केली होती. ३९ वर्षीय अँडरसन सध्या १६३ वा सामना खेळत आहे.
नॉटिंघम कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला; तेव्हा ४ बाद १२५ धावा जमवल्या होत्या. त्यामुळे उर्वरित सहा फलंदाजांपैकी एक बळी मिळवत तो ६२० बळींसह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा सर्वकालीन महान गोलंदाज बनेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. त्याने १३३ कसोटींमध्ये ८०० बळी मिळवले होते. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १४५ कसोटी सामने खेळताना ७०६ बळी मिळवले होते. यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५६३ बळी मिळविण्याची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
खेलरत्न पुरस्कारानंतर आता नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलण्याची होतेय मागणी
‘चेंडू माझ्या पट्ट्यात आला तर मी चौकार किंवा षटकार ठोकणारच,’ रोहितचे टीकाकारांना सणसणीत उत्तर
अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे