भारत आणि इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीचा आज (०९ फेब्रुवारी) शेवटचा दिवस असून सामना अतिशय रोमांचक घडीवर आला आहे. इंग्लंडच्या ४२० धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर १ विकेट गमावून ३९ धावा केल्या. त्यानंतर आज उर्वरित ३८१ धावांचे आव्हान डोळ्यापुढे ठेवून भारतीय संघ मैदानावर उतरला आहे. अशात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन याने भेदक गोलंदाजी करत एकाच षटकाच भारताला दोन धक्के दिले.
झाले असे की, पाचव्या दिवशी भारताने पहिल्या डावातील १३ व्या षटकापासून आणि १ बाद ३९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल फलंदाजीसाठी मैदानावर आले होते. इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे चिवट झुंज देत गिलने कसेबसे ८३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले. अशात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने डावातील २७ वे षटक अंडरसनच्या हाती सोपवले.
अंडरसनने त्याच्या षटकातील दुसरा चेंडू मिड-ऑनवर टाकला. तो चेंडू टप्पा घेऊन गिलच्या बॅट आणि पायाच्या मधून गेला आणि सरळ मागे यष्टीला जाऊन लागला. यासह गिलच्या रुपात अंडरसनला मोठी विकेट मिळाली.
एवढ्यावरच तो थांबला नाही, तर पुढील चौथ्या चेंडूवर त्याने भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला पायचित केले. परंतु पंचांनी तो बाद असल्याचे घोषित न केल्याने इंग्लंडने रिव्ह्यू घेतला. परंतु चेंडू बॅटला न लागल्याने थोडक्यात रहाणे बचावला. असे असले तरीही, पुढे जबरदस्त बाउंसर टाकत अंडरसनने रहाणेची दांडी उडवली. यामुळे अवघ्या शून्य धावांवर रहाणे पव्हेलियनला परतला. अशाप्रकारे अंडरसनने एकाच षटकातील चार चेंडूमध्ये २ विकेट्स घेतल्या, त्याही त्रिफळाचित.
गिल आणि रहाणेनंतर रिषभ पंत व वॉशिंग्टन सुंदर देखील स्वस्तात बाद झाले. सध्या कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू आर अश्विन फलंदाजी करत आहेत. कोहलीने नाबाद ४० धावा केल्या आहेत. तर अश्विन नाबाद १ धावेवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या घरी चोरी, महागडी कार लंपास
हीच ती वेळ, लढा आणि जिंका! चेन्नई कसोटीबाबत टीम इंडियाची अंतिम चर्चा, पाहा व्हिडिओ




