आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२१ (Asian Champions Trophy 2021) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला (India Mens Hockey Team) जपानकडून उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जपानने भारताचा ५-३ असा धुव्वा उडवत उलटफेर केला. गोलफरकात सामना जवळचा दिसत असला तरी, मधल्या क्वार्टरमध्ये भारताने सामना हातातून जाऊ दिला. त्यानंतर संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या संघाची अंतिम फेरी गाठण्याची संधी हुकली. विशेष म्हणजे याच स्पर्धेतील गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारताने जपानचा ६-० असा पराभव केला होता. (Japan Beat India)
सामना सुरू होण्यापूर्वी भारत विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. जपानविरुद्ध भारताचा रेकॉर्डही चांगला आहे. मात्र, उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी संघाने गतविजेत्यांला चकित केले. भारत आणि जपानचा संघ यापूर्वी १८ वेळा आमनेसामने आले होते. त्यापैकी भारताने १६ सामने जिंकले होते, तर एक सामना गमावला होता आणि एक सामना अनिर्णित राहिलेला. जेतेपदाच्या लढतीत जपानचा सामना दक्षिण कोरियाशी होईल. तर, बुधवारी कांस्य पदकाच्या प्ले-ऑफमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाने पाकिस्तानचा ६-५ असा पराभव केला होता. भारताने राऊंड रॉबिन टप्प्यात अपराजित राहून अव्वल स्थान पटकावलेले.
असे झाले गोल
शोटा यामादाने पहिल्याच मिनिटाला पेनल्टीवर गोल करून जपानला आघाडी मिळवून दिली. तर, रेकी फुजिशिमा (दुसरा मिनिट), योशिकी किरिशिता (१४ वा मिनिट), कोसेई कावाबे (३५ वा मिनिट) आणि र्योमा ओका (४१ वा मिनिट) यांनीही गोल केले. भारताकडून दिलप्रीत सिंग (१७ वे मिनिट), उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (४३ वे मिनिट) आणि हार्दिक सिंग (५८ वे मिनिट) यांनी गोल केले.
महत्त्वाच्या बातम्या-